Dinesh Karthik Dipika Pallikal Welcomes baby girl: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) साठी २०२६ चा आयपीएल हंगाम खास असणार आहे. गतविजेते म्हणून संघ मैदानात उतरत आपलं जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, संघाचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक, दिनेश कार्तिक यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. दिनेश कार्तिक आणि दिपिका पल्लीकल हे लेकीचे आईबाबा झाले आहेत.
दिनेश कार्तिकची पत्नी, दीपिका पल्लीकल हिने मुलीला जन्म दिला आहे. आज १९ मार्चला कार्तिकने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली. हा त्याच्या कुटुंबासाठी एक अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे. दिनेश कार्तिकने आपल्या मुलीचं नावही जाहीर केलं आहे. दिनेश कार्तिक व दिपिका पल्लीकल यांनी जुळी मुलं आहेत आणि आता त्यांच्या छोट्या बहिणीचं त्यांनी आनंदाने स्वागत केलं आहे.
दिनेश कार्तिकने आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं?
दिनेश कार्तिकच्या जुळ्या मुलांची नावं कबीर व झियान अशी आहेत. यानंतर जोडप्याने त्यांच्या लेकीचं नाव ‘राहा पल्लीकल कार्तिक’ असं ठेवलं आहे. हॅलो बेबी गर्ल असं कॅप्शन देत कार्तिकने ही पोस्ट शेअर केली असून यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने देखील दिनेश कार्तिकच्या लेकीच्या या पोस्टवर हार्ट इमोजीसह कमेंट केली आहे.
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी २०१३ मध्ये साखरपुडा केल्यानंतर २०१५ मध्ये लग्न केलं. त्यांचे लग्न १८ ऑगस्ट रोजी ख्रिश्चन पद्धतीने आणि २० ऑगस्ट रोजी हिंदू पद्धतीने झालं. २०२१ मध्ये या जोडप्याला झियान आणि कबीर नावाची जुळं मुलं झाली. आता मुलीच्या आगमनाने कुटुंब आनंदाने भरून गेलं आहे. दीपिका पल्लीकल ही एक भारतीय स्क्वॅश खेळाडू असून तिने कार्तिकच्या क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
कार्तिकची क्रिकेट कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. तो आयपीएलमध्ये अनेक हंगामांसाठी आरसीबीकडून खेळला आणि फिनिशर म्हणून त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. निवृत्तीनंतर, त्याने कोचिंगकडे आपला मोर्चा वळवला. प्रशिक्षणाचा अनुभव संघातील तरुण फलंदाजांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीची फलंदाजी मजबूत करण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याने आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी २६ कसोटी, ९४ एकदिवसीय आणि ६० टी-२० सामने खेळून ३,४६३ धावा केल्या आहेत.
