नवी दिल्ली : रविवारपासून सुरू होणाऱ्या कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पध्रेत दमदार कामगिरी करत २०२०मध्ये टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे ध्येय भारताची अव्वल जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्मकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे.

बाकू येथे १७ ते १९ मार्चदरम्यान विश्वचषक स्पर्धा रंगणार असून नोव्हेंबर, २०१८मध्ये जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकात कांस्यपदक मिळवून दीपाने ऑलिम्पिक प्रवेशासाठी आपली दावेदारी प्रबळ केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या दीपासाठी ही पहिलीच मुख्य स्पर्धा असून याकरता तिने मेलबर्नमध्ये २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या विश्वचषकातून माघार घेतली होती.

‘‘यंदा ऑलिम्पिकसाठी वर्षभरात होणाऱ्या सर्व विश्वचषकातील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्पध्रेत मला सर्वोत्तम खेळ करायचा आहे,’’ असे दीपाने सांगितले.