स्वप्न पाहण्याचे धाडस दाखवल्यामुळेच रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी झाले, असे मत पॅरालिम्पिक स्पध्रेत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू दीपा मलिकने व्यक्त केले. सोमवारी दीपाने गोळाफेक एफ-५३ प्रकारात ४.६१ मीटर अंतरासह रौप्यपदक निश्चित केले होते.

‘‘स्वप्न पाहण्याचे धाडस मी केले आणि त्या निर्धाराने मी अथक मेहनत घेतली. स्वप्नपूर्ती करण्यासाठी चिकाटीने सराव केला. या स्वप्नांचा पाठलाग करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. माझ्या मुलांनीही मला चांगले सहकार्य केले,’’ असे मत दीपाने व्यक्त केले.

१७ वर्षांपूर्वी पाठीच्या कण्याला झालेल्या टय़ूमरमुळे दीपाच्या शरीराच्या अध्र्या भागाला पक्षाघात झाला. यामुळे तिच्या चालण्यावर संपूर्णपणे मर्यादा आल्या. व्हीलचेअरकेंद्रित आयुष्य होऊनही तिने खेळण्याची जिद्द सोडली नाही. टय़ूमर काढण्यासाठी दीपावर ३१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेचा भाग म्हणून दीपाच्या पायावर तब्बल १८३ टाके घालण्यात आले होते. लष्करात कार्यरत पती आणि दोन मुलांच्या पाठिंब्याच्या बळावर दीपाने पदकाची कमाई केली.

ती म्हणाली, ‘‘पदक जिंकल्याचा आनंद आहेच. पण त्याहून अधिक देशसेवा केल्याचा अभिमान वाटतो. प्रशिक्षक, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा मंत्रालय यांचे आभार. माझे पती आणि मला प्रेरणा व ताकद देणाऱ्या मुलींचीही मी विशेष आभारी आहे.’’