भारताच्या सीमा अंतीलने थाळीफेकीत सुवर्णपदक मिळवीत अ‍ॅथलेटिक्समध्ये सोनेरी कामगिरीची अपेक्षापूर्ती केली. तिची सहकारी ओ.पी. जैशा हिने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले, तर नवीनकुमार याने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
सीमा हिने ६१.०३ मीटर अंतरापर्यंत थाळीफेक केली, तर तिची सहकारी कृष्णा पुनियाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने ५५.५७ मीटपर्यंत थाळी फेकली. ३१ वर्षीय खेळाडू सीमाने गेल्या दोन आशियाई स्पर्धामध्ये भाग घेतला नव्हता. तिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. तिने पहिल्या प्रयत्नात ५५.७६ मीटर अंतर कापले. चौथ्या प्रयत्नात तिने ६१.०३ मीटर अंतरापर्यंत थाळीफेक केली. चीनच्या लिऊ झियोझिन (५९.३५ मीटर) हिने रौप्यपदक मिळविले, तर तिची सहकारी तान जियान (५९.०३ मीटर) हिला कांस्यपदक मिळाले.

अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले – सीमा
या स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्यासाठी मी गेली अनेक वर्षे मेहनत घेतली होती. त्यातही गेली तीन वर्षे मी कठोर परिश्रमाबरोबर शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती यावर भर दिला होता. माझ्या परिश्रमाचे फळ मिळाले आहे, असे सीमा हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले. ती पुढे म्हणाली, सहसा पहिल्या प्रयत्नात माझी कामगिरी खराब असते. येथे पहिल्याच प्रयत्नात माझी कामगिरी चांगली झाल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकामुळे मी येथेही पदक मिळवीन अशी मला खात्री होती.
पंधराशे मीटर शर्यतीत जैशा हिने सुवर्णपदक मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिने ही शर्यत चार मिनिटे १३.४६ सेकंदांत पार केली.
सेनादलात हवालदार म्हणून काम करणाऱ्या नवीनकुमार याने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यत आठ मिनिटे ४०.३९ सेकंदांत पार करीत कांस्यपदक मिळविले. त्याचे हे आशियाई स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
भारताच्या अन्य खेळाडूंनी निराशा केली. उंच उडीत निखिल चित्तारासु याने तिसऱ्या प्रयत्नात २.१५ मीटर अंतर पार केले, मात्र त्यानंतर त्याला उंच उडी घेता आली नाही.
महिलांच्या लांब उडीत भारताच्या एम.ए. प्रजुषा व मायुखी जॉनी यांना अनुक्रमे आठवे व नववे स्थान मिळाले. स्पर्धेत बारा स्पर्धकांचा समावेश होता.

बजरंगचे सुवर्णपदक हुकले
कुस्ती
भारताच्या बजरंगचे कुस्तीमधील सुवर्णपदक थोडक्यात हुकले. योगेश्वर दत्तने मिळविलेल्या सुवर्णपदकासह भारताने या स्पर्धेत पाच पदकांची कमाई केली. बजरंग या युवा खेळाडूने ६१ किलो गटात अंतिम फेरीत स्थान मिळवीत सोनेरी यशाच्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या, मात्र चुरशीच्या अंतिम लढतीत त्याला इराणच्या मासूद महंमद याने ३-१ असे पराभूत केले. बजरंगने महंमद याला चांगली झुंज दिली, मात्र इराणच्या मल्लाने ताकदीचा उपयोग करीत ही लढत जिंकली.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशीलकुमारच्या माघारीमुळे नरसिंग याला ७४ किलो गटात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्याने जपानच्या दाईसुके शिमदा याला चांगली लढत दिली, मात्र अखेर त्याला १-३ असा पराभव स्वीकारावा लागला. पवनकुमारला ८६ किलो गटात रिपेच लढतींद्वारे कांस्यपदक मिळविण्याची संधी होती, मात्र त्याला चीनच्या झांग फेंगने ४-१ अशा गुणांनी पराभूत केले.
बजरंगने अंतिम फेरीत स्थान मिळविण्यापूर्वी मंगोलियाच्या तुमेनबिलेह तुवशिंतुलगा याला ३-१ असे हरविले. पाठोपाठ त्याने ताजिकिस्तानच्या फाखरेदी उस्मोंझोदा याला ४-१ असे नमविले. उपांत्य फेरीत त्याला जपानच्या नोरियुकी ताकास्तुकाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. नोरियुकीने पहिल्या फेरीत २-० अशी आघाडी घेतली, मात्र नंतर बजरंगने उर्वरित दोन्ही फेऱ्यांमध्ये आघाडी मिळवीत लढत जिंकली.