Disney + Hotstar Special Offers for Fans: आशिया कप २०२३ स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेनंतर आयसीसीची मोठी स्पर्धा एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरु होणार आहे. ही स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. त्तत्पुर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी + हॉटस्टारने एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण डिज्नी + हॉटस्टारने जिओ सिनेमाला टक्कर देण्यासाठी आशिया कप पाठोपाठ एकदिवसीय विश्वचषक मोबाईल अॅपवर विनामूल्य प्रवाहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिओ सिनेमाने आपल्या मोबाईल अॅपवर मोठ्या क्रिकेट टूर्नामेंट्सचे मोफत स्ट्रीमिंग ऑफर करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आयपीएल २०२३ चा हंगाम विनामूल्य दाखवले. त्यामुळे त्यांच्या अॅपला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. आशिया चषक २०२३ स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका येथे ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळली जात आहे. त्यानंतर आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे.
हॉटस्टारचे मोठे नुकसान झाले –
डिज्नी + हॉटस्टारच्या युजरबेसमध्ये सातत्याने घट होत आहे. रॉयटर्सच्या मते, डिस्ने + हॉटस्टारकडे गेल्या वर्षी सर्वात जास्त युजरबेस होता. तथापि, मार्च २०२२ पासून ते कमी होऊ लागले, परिणामी कंपनीचे $41.5 दशलक्ष इतके मोठे नुकसान झाले. त्याच वर्षी ऑक्टोबर ते जुलै दरम्यान युजरबेस सुमारे २५ टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे कंपनीवर पुन्हा फायदेशीर होण्याचे मार्ग शोधण्याचा दबाव आला.
एचबीओने डिस्नेशी तोडले संबंध –
डिज्नी + हॉटस्टारची घसरण होण्यामागील एक प्राथमिक कारण म्हणजे एचबीओ शो जाणे पण आहे. गेम ऑफ थ्रोन्स, सक्सेशन आणि आगामी हॅरी पॉटर मालिका यांसारखे लोकप्रिय शो, जे पूर्वी डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केले गेले होते, ते आता जिओ सिनेमावर हलवले गेले आहेत. रिलायन्स जिओने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसोबत त्यांच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, जिओ सिनेमावरवर लोकप्रिय हॉलिवूड सामग्री आणण्यासाठी करार केला. त्यामुळे डिस्नेचे आणखी नुकसान झाले.
हेही वाचा – NZ vs ENG 1st T20: टीम साऊदीने रचला इतिहास! शाकिब अल हसनला मागे टाकत केला ‘हा’ खास कारनामा
डिज्नीला आयपीएलमधून दुप्पट प्रेक्षकांची अपेक्षा –
डिज्नी + हॉटस्टारचा विश्वास आहे की विश्वचषक आणि आशिया कप क्रिकेट सामने पाहणाऱ्यांची संख्या ५० दशलक्षांपर्यंत पोहोचू शकते. खरंच असे झाल्यास, मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमावर प्लॅटफॉर्मवर इंडियन प्रीमियर लीग पाहणाऱ्यांची संख्या ५६ टक्क्यांनी ओलांडली जाईल. डिज्नीला यातून बंपर कमाई अपेक्षित आहे. डिस्नेने ही सुविधा केवळ मोबाइलसाठी दिली असली तरी, अशा परिस्थितीत लॅपटॉप आणि मोठ्या स्क्रीनवर ती पाहणाऱ्या प्रेक्षकांना अद्याप प्रीमियम प्लॅन घ्यावा लागणार आहे.