पॅरिस : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच व अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने आपली विजय लय कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. याच गटात कारेन खाचानोव्ह, नॉर्वेच्या कॅस्पर रुड व जर्मनीच्या आलेक्झांडर झ्वेरेव यांनी आगेकूच केली. महिला गटात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा व टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर यांनी पुढची फेरी गाठली.
पुरुष एकेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित जोकोव्हिचने पेरुच्या जुआन पाब्लो वारिलासला ६-३, ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोव्हिचने आक्रमक खेळ करताना वारिलासला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही व विजय साकारला. उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचसमोर ११व्या मानांकित कारेन खाचानोव्हचे आव्हान असेल. अल्कराझने आपली लय कायम राखताना इटलीच्या लॉरेंझो मुसेट्टीवर ६—३, ६—२, ६—२ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत उपांत्यफेरीतील आपली जागा निष्टिद्धr(१५५)त केली. खाचानोव्हने इटलीच्या लॉरेंझो सोनेगोला १-६, ६-४, ७-६ (९-७), ६-१ असे नमवले. अन्य सामन्यात चौथ्या मानांकित रुडने चीनच्या झँग झिझेनला ४-६, ६-४, ६-१, ६-४ असे पराभूत करत पुढची फेरी गाठली. तर, झ्वेरेवने १२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सेस टिआफोवर ३-६, ७-६ (७-३), ६-१, ७-६ (७-५) असा विजय नोंदवला.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.