‘तुल्यबळ खेळाडूंची आव्हाने वाढत असली तरी एकाच वर्षांत चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे आजही शक्य आहे आणि हे मी दाखवून दिले. माझ्यासाठी ही स्वप्नवत कामगिरी असून त्याचाच मला अधिक आनंद झाला आहे,’ असे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे पहिलेच विजेतेपद मिळविणाऱ्या नोवाक जोकोव्हिचने सांगितले.

एकाच वर्षांत चारही ग्रँड स्लॅम स्पर्धाजिंकण्याची किमया करणारा जोकोव्हिच हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी १९३८ मध्ये डॉन बज यांनी पहिल्यांदा ही कामगिरी केली होती. त्यानंतर १९६२ व १९६९ मध्ये रॉड लेव्हर यांनी असेच यश मिळविले होते.

‘फ्रेंच स्पर्धेच्या विजेतेपदाने मला यापूर्वी हुलकावणी दिली होती. तीन वेळा अंतिम फेरीत मला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच हे विजेतेपद माझ्यासाठी खूप विशेष कामगिरीचे आहे. हा आनंद कसा व्यक्त करावा हे मला सुचतच नव्हते. अर्थात आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे मला समाधान वाटत आहे. भविष्यकाळातही मी चारही स्पर्धा एकाच वर्षी जिंकण्याची कामगिरी करू शकेन,’ असे जोकोव्हिच म्हणाला.

जोकोव्हिचचे हे बारावे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सहा वेळा तर विम्बल्डन स्पर्धेत तीन वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. तसेच अमेरिकन ओपन स्पर्धेत तो दोन वेळा विजेता ठरला आहे.

जोकोव्हिच म्हणाला, ‘रॉड लेव्हर यांच्यानंतर मी ऐतिहासिक कामगिरी केली यावर माझा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. खेळाडू म्हणून सातत्याने नवनवीन आव्हानांना आम्हास सामोरे जावे लागत असते.’

तो पुढे म्हणाला की, ‘अंतिम फेरीत माझ्यापुढे अँडी मरे या बलाढय़ खेळाडूचे आव्हान होते. पहिला सेट गमावल्यानंतरही माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. चौथ्या सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेतल्यानंतर मला खूप हसू येत होते. विजेतेपदाच्या जवळ पोहोचल्याचाच तो आनंद होता. एकाच वेळी थोडेसे दडपण व अजिंक्यपदाची उत्सुकता या कात्रीत मी सापडलो होतो. जेव्हा मी विजेतेपदाचा गुण मिळविला, त्या वेळी एक क्षण माझ्या कामगिरीवर माझा विश्वासच बसला नाही. लोकांनी उभे राहून टाळ्यांनी माझे अभिनंदन केले तेव्हाच मी भानावर आलो.’