झ्वेरेव्ह, बेरेट्टिनी, बार्टी, प्लिस्कोव्हाचे विजय

एपी, न्यूयॉर्क

सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी या अग्रमानांकित खेळाडूंनी शुक्रवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनीही विजयी घोडदौड कायम राखली.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या जोकोव्हिचने पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीच्या लढतीत नेदरलँड्सच्या डॅलोन ग्रीकस्पूरला ६-२, ६-३, ६-२ अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. या लढतीतसुद्धा जोकोव्हिचला काही हुल्लडबाज चाहत्यांनी डिवचले. ३४ वर्षीय जोकोव्हिचसमोर पुढील फेरीत केई निशिकोरीचे आव्हान असेल.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाल्याने जोकोव्हिचची गोल्डन स्लॅमची संधी निसटली. परंतु यंदाच्या वर्षांतील ग्रँडस्लॅम सामन्यांमध्ये तो २३ सामन्यांपासून अपराजित आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन जेतेपदानंतर जोकोव्हिच आणखी पाच लढती जिंकून कॅलेंडर स्लॅम साकारणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

चौथ्या मानांकित झ्वेरेव्हने स्पेनच्या अल्बर्ट रामोसचा ६-१, ६-०, ६-३ असा धुव्वा उडवला. इटलीच्या सहाव्या मानांकित मॅटेओ बेरेट्टिनीने कोरेन्टिन मॉटेवर सरशी साधण्यासाठी ७-६ (७-२), ४-६, ६-४, ६-३ असा चार सेटपर्यंत घाम गाळला.

महिलांमध्ये अग्रमानांकित बार्टीने डेन्मार्कच्या क्लॅरा टॉसेनवर ६-१, ७-५ अशी मात केली.चौथ्या मानांकित प्लिस्कोव्हाने अमांडा अ‍ॅनिसिमोव्हावर ७-५, ६-७ (५-७), ७-६ (९-७) असा संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवला. पोलंडच्या इगा श्विऑनटेकने फिओना फेरोवर ६-३, ६-० असे वर्चस्व गाजवले. तर कॅनडाच्या २०१९च्या विजेत्या बियांका आंद्रेस्कूने स्पर्धेतील सलग नववा विजय नोंदवताना लॉरेन डेव्हिसला ६-४, ६-४ असे नमवले. गतवर्षी करोना साथीच्या  पार्श्वभूमीवर सहावी मानांकित आंद्रेस्कू स्पर्धेत सहभागी झाली नाही.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

भारताचे सानिया, शरण पहिल्या फेरीतच गारद

सानिया मिर्झा आणि दिविज शरण या भारतीय टेनिसपटूंचे अनुक्रमे महिला आणि पुरुष दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. नॅडिआ किचेनॉक आणि रालुका ओलारू यांनी सानिया आणि तिची अमेरिकन सहकारी कोको वँडवीगे यांना ४-६, ६-४, ६-३ असे पराभूत केले. पुरुष दुहेरीत अमेरिकेचा राजीव राम आणि अमेरिकेचा जो सॅलिसबरी यांनी शरण आणि त्याचा दक्षिण कोरियन सहकारी क्वोन सोन-वू यांच्यावर ६-३, ६-४ अशी मात केली.