वसिम अक्रमचा पीसीबीला सल्ला
पाकिस्तानविरुद्धच्या प्रस्तावित मालिकेला भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही. परंतु मार्च-एप्रिल महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर बहिष्कार घालण्याचा विचार पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) करू नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने दिला आहे.
‘‘पाकिस्तानविरुद्ध मालिकेचा निर्णय घेण्यास पाकिस्तानने कमालीचा विलंब केला आहे. ही मालिका आता होऊ शकत नसेल, तर लवकरच ती होईल अशी आशा आहे,’’ असे अक्रमने सांगितले.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्टपणे उत्तर देण्याची आवश्यकता आहे की, त्यांना खेळायचे आहे की नाही? मात्र या कारणास्तव ट्वेन्टी-२० विश्वचषकात न खेळण्याचा विचार पीसीबीने करणे योग्य ठरणार नाही,’’ असे अक्रम या वेळी म्हणाला.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषक ही आयसीसीची स्पर्धा असते. त्यामुळे त्यात सहभागी होणे क्रमप्राप्त असते. जर आपण त्या स्पध्रेत सहभागी झालो नाही, तर त्याचे दीर्घकाळ परिणाम आपल्याला भोगावे लागतील,’’ अशा सूचना अक्रमने दिल्या आहेत.
तो पुढे म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात न खेळल्यास पाकिस्तानचे खेळाडू आणि तेथील क्रिकेट यावर परिणाम होऊ शकेल. परंतु भारताला जर आपल्याशी खेळायचे नसेल, तर काहीच हरकत नाही. त्यांच्याशी खेळलो नाही, तर आपले काहीही बिघडणार नाही. परंतु या दोन देशांमधील सामने झाले काय किंवा नाही झाले काय दहशतवादाची समस्या मात्र संपणार नाही. मात्र भारत-पाक मालिका सुरू झाल्यास दोन्ही देशांमधील क्रिकेटसाठी ते चांगले ठरेल.’’ भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ पाठवण्यापूर्वी पाकिस्तान सरकारच्या परवानगीची नितांत आवश्यकता असेल, असे पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी सांगितले होते. अनुभवी फलंदाज युनिस खान आणि राष्ट्रीय प्रशिक्षक वकार युनूस यांनी सर्वप्रथम आपापसातील मतभेद दूर करण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती अक्रमने केली. तो म्हणाला, ‘‘हे दोघे एकमेकांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे ज्या गोष्टी करीत आहेत, ते त्यांच्यासाठी आणि पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी चांगले नाही.’’