प्रचंड वेगासह गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना फलंदाजांची भंबेरी उडवणारा ब्रेट ली भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. समालोचनाच्या निमित्ताने ब्रेट ली भारतात असतो तेव्हाही त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो. ब्रेट ली आणि आशा भोसले यांचं गाणंही गाजलं होतं. याच ब्रेट लीचा भाऊही क्रिकेट खेळला हे तुम्हाला माहितेय का? आश्चर्य वाटलं ना- पण हे खरं आहे. ८ ऑगस्टला शेन लीचा वाढदिवस असतो.

ब्रेट लीच्या तुलनेत काहीशी स्थूल वाटावी अशी शरीरयष्टी, पिंगट वर्ण, हिरवे करडे डोळे, ब्राऊन रंगाचे भुरभुरणारे केस असा शेन ली गोलंदाजी करायचा. आवश्यकता भासेल तेव्हा उपयुक्त फलंदाजीही करायचा.

वनडे क्रिकेटसाठी शेन लीचा खेळ पोषक होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात त्याची निवड झाली. त्याकाळी टी२० प्रकार असता तर शेन ली त्या संघात नक्कीच दिसला असता. शेन लीने ४५ वनडेत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या नावावर ४८ विकेट्स आहेत.

१७ डिसेंबर १९९५ रोजी अ‍ॅडलेड इथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत शेनने पदार्पण केलं. पदार्पणाच्या लढतीत शेनने २७ चेंडूत ३९ धावा केल्या आणि एक विकेटही पटकावली. योगायोग म्हणजे ३ एप्रिल २००१ रोजी विशाखापट्णम इथे झालेला सामना शेनच्या कारकिर्दीतला शेवटचा सामना ठरला.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे शेनला सातत्याने त्रास दिला. हे दुखणं बळावल्याने तो संघाबाहेरही गेला. दुखापतीतून सावरून खेळणं शक्य नसल्याने शेनने २९व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केला.

ब्रेट ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाजांपैकी एक झाला. त्याने ७६ टेस्ट, २२१ वनडे आणि २५ टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. ब्रेट लीच्या नावावर ७००पेक्षा जास्त विकेट्स आहेत. ब्रेट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असताना आयपीएल स्पर्धा सुरू झाली. आयपीएल स्पर्धेत ब्रेट कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघाकडून खेळला. ब्रेटलाही कारकिर्दीत अनेक दुखापतींनी त्रास दिला पण त्याने जिद्दीने त्यावर मात करत दिमाखदार कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियासाठी खेळणाऱ्या मोजक्या भावांच्या जोडगोळ्यांमध्ये ब्रेट आणि शेनचा समावेश होतो. इयन, ग्रेग आणि ट्रेव्हर हे तिघे बंधू ऑस्ट्रेलियासाठी खेळले. शॉन आणि मिचेल मार्श हे दोघेही ऑस्ट्रेलियासाठी खेळले, पण दोघांचीही कारकीर्द दुखापतींमुळे झाकोळली. माईक आणि डेव्हिड हसी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने जगभरातील टी२० स्पर्धांमध्ये छाप उमटवली. स्टीव आणि मार्क वॉ ही भावांची जोडी सेलिब्रेटी ठरली. ज्येष्ठ समालोचक रिची बेनॉ आणि जॉन बेनॉ हेही ऑस्ट्रेलियासाठी खेळले. अलीकडच्या काळात अॅश्टन आणि वेस्ले अगर यांनी ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याचा मान पटकावला.