उपनगरातून मुंबई गाठणं हा लोकल प्रवास अनेक चाकरमान्यांच्या नशिबी असतो. अनेक वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या अजिंक्यने हा प्रवास सुरू केला. प्रचंड गर्दीत भलीमोठ्ठी किटबॅग घेऊन मैदानात पोहोचून सराव करून तो संध्याकाळी घरी परतत असे. याच प्रवासाने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर झालेल्या अजिंक्यच्या नेतृत्वातच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात चीतपट करण्याची किमया साधली.

दुखापतींमुळे घटत जाणारा संघ आणि नामुष्की ओढवणारा पराभव अशा परिस्थितीत नेतृत्वाची धुरा मिळालेल्या अजिंक्यने नेतृत्व कसं करावा याचा वस्तुपाठ सादर केला. दमदार प्रदर्शनासह अजिंक्यने संघासमोर आदर्श उदाहरण सादर केलं. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे अजिंक्यने युवा आणि अनुभवी यांची मोट बांधली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसह शेरेबाजीला पुरून उरत अजिंक्यने कांगारुंच्या भूमीत कसं खेळावं याचा डेमोच दिला.

अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे रहाणेचं मूळ गाव. त्याचं लहानपण मुंबईचं उपनगर असलेल्या डोंबिवलीत गेलं. त्याचे वडील मधुकर राहाणे यांनी त्याला डोंबिवलीच्या एका क्रिकेट कोचिंग कँपमध्ये नेलं आणि तिथून खरंतर त्याच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला.

त्याच्या वडिलांनी एकदा एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. “मी तर त्याला त्या कँपमध्ये घेऊन गेलो, कारण मला वाटायचं, त्याने शाळेनंतरचा त्याचा वेळ टवाळक्या करत वाया घालवू नये. तिथल्या कोचने त्याला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो दाखवत विचारलं, याला ओळखतोस?

“तेव्हा तो म्हणाला, हो. सचिन तेंडुलकर. कोचने मग विचारलं, मग एक दिवस याच्यासोबत खेळायचंय? अज्जू हो म्हणाला. आणि मला जरा अवघडल्यासारखं वाटलं. कारण एवढं मोठं स्वप्न त्याने अचानक असं बोलून दाखवलं होतं.” रहाणे कराटेत ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे.

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये बोलताना अजिंक्यने डोंबिवली मुंबई प्रवासाविषयी सांगितलं होतं. वडिलांबरोबर किटबॅग घेऊन जायला सुरुवात केली. कामावर जायचं असल्यामुळे वडिलांना रोज बरोबर येणं शक्य नव्हतं. जायचं कसं हे कळल्यावर वडिलांनी अजिंक्यला एकट्याने पाठवलं. मात्र लहानगा अजिंक्य एवढ्या गर्दीत जाईल का याची काळजी वडिलांना होती. त्यामुळे अजिंक्य किटबॅग घेऊन ट्रेनमध्ये चढल्यावर त्याचे बाबा मागच्या डब्यात चढले. सीएसटीला उतरून तो मैदानात व्यवस्थित जातो आहे लक्षात आल्यानंतर त्याचे बाबा ऑफिसला गेले. हा प्रसंग अजिंक्यला काही वर्षांनी कळला. त्यानंतर आईवडिलांसाठी खेळायचं असं त्याने ठरवलं. घरचे आपल्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करतात. आपल्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा असतो.

उत्तम तंत्रकौशल्य, चांगल्या दर्जाच्या बॉलिंगचा सामना करण्याची ताकद, मोठी खेळी करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन, चपळ फिल्डर आणि दमदार फिटनेस या गुणकौशल्यांच्या बळावर अजिंक्यने मुंबई क्रिकेट गाजवलं.

विविध वयोगट स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर तो मुंबईसाठी खेळू लागला. मुंबईसाठी रणजी क्रिकेटमध्ये त्याने धावांची टांकसाळ उघडली. अजिंक्य ऐन भरात असताना टीम इंडियात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण असे रथीमहारथी खेळत होते. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे अजिंक्यची टीम इंडियासाठी निवड व्हायची मात्र बराच काळ त्याला राखीव खेळाडू म्हणून वावरावं लागलं. पदार्पणासाठी त्याला १६ महिने वाट पाहावी लागली.

राहुल द्रविडचा शिष्य

तत्वनिष्ठ आणि खेळाप्रति अतीव सचोटी यामुळे अजिंक्य रहाणे म्हणजे आधुनिक काळातील राहुल द्रविड असं वर्णन होऊ लागलं. भारतीय संघ आणि आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना द्रविड यांच्याबरोबर आणि काही काळानंतर त्यांच्या मार्गदर्शनात खेळायची संधी मिळाली.

ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला भेदला

२०२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. अ‍ॅडलेड इथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा डाव ३६ धावांतच आटोपला. इतक्या कमी धावसंख्येवर गारद झाल्याने भारतीय संघावर जोरदार टीका झाली. भारतीय संघाला विदेशात खेळता येत नाही असा सूर दिसू लागला. या सामन्यानंतर पॅटर्निटी लिव्हसाठी विराट कोहली मायदेशी परतणार होता. ३६ धावात डाव संपुष्टात आल्याने कोहली निर्णय बदलून संघाबरोबर राहणार का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. एकीकडे या चर्चा आणि दुसरीकडे संघाला लागलेलं दुखापतींचं ग्रहण यामुळे परिस्थिती संवेदनशील झाली होती. अजिंक्यकडे टीम इंडियाची धुरा अजिंक्यकडे सोपवून विराट मायदेशी परतला.

मेलबर्न कसोटीत खणखणीत शतकी खेळीसह अजिंक्यने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. ३६ धावांत माघारी परतलेल्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकत मालिकेत १-१ बरोबरी केली. हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या चिवट झुंजीसह भारताने सिडनी कसोटी ड्रॉ केली. ऋषभ पंतच्या नाबाद ८९ धावांच्या बळावर भारतीय संघाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकत ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला. सिडनी कसोटीपूर्वी भारताकडे पूर्ण फिट ११ खेळाडूही नसतील अशी स्थिती होती. मात्र अजिंक्यने खचून न जाता नेतृत्व हाताळलं.