सिडनीमधील अखेरच्या कसोटी सामन्याचे फक्त दोनच दिवस सरले आहेत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाची कसोटी मालिकेत ५-० अशा निर्विवाद वर्चस्वाकडे वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: नेस्तनाबूत केले. त्यामुळे दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे ३११ धावांची आघाडी जमा आहे.
इंग्लिश फलंदाजी फक्त १५५ धावांत कोलमडली. त्यामुळे या अॅशेस मालिकेत पाचव्यांदा दोनशेहून कमी धावसंख्येत इंग्लंडचा संघ गारद झाला. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १४० अशी मजल मारली. शेवटच्या पाच डावांपैकी चौथे अर्धशतक साकारणारा ख्रिस रॉजर्स ७३ धावांवर आणि जॉर्ज बेली २० धावांवर खेळत आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात टिच्चून गोलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नर (१६), शेन वॉटसन (९), कर्णधार मायकेल क्लार्क (६) आणि स्टीव्ह स्मिथ (७) यांना स्वस्तात तंबूची वाट दाखवत इंग्लिश गोलंदाजांनी अंकुश ठेवला.
त्याआधी, रयान हॅरिस, मिचेल जॉन्सन आणि पीटर सिडल या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान त्रिकुटाने प्रत्येकी तीन बळी घेत इंग्लंडचा डाव गुंडाळला. परंतु इंग्लंडने फॉलो-ऑनची नामुष्की टाळण्यात यश मिळवले. सकाळच्या सत्रात इंग्लंडची ५ बाद २३ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. परंतु बेन स्टोक्स, गॅरी बॅलन्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ६ बळी घेणाऱ्या स्टोक्सने १०१ चेंडूंत ४७ धावा केल्या.



