Donald Trump discourages Iran from playing at 2026 FIFA World Cup: क्रिकेटमधील टी-२० विश्वचषकानंतर आता फुटबॉलप्रेमींच्या नजरा यंदा होणाऱ्या फिफा विश्वचषकावर आहेत. फुटबॉलमधील सर्वाेच्च स्पर्धा असलेला फिफा विश्वचषक अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या विश्वचषकात इराणचा संघदेखील उतरणार आहे. पण सध्याच्या स्थितीला मध्य पूर्वेमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता स्पर्धेवर याचा परिणाम होणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत. पण यादरम्यान ट्रम्प यांनी इराण संघाला स्पर्धेत खेळण्यापासून परावृत्त केलं आहे. यंदाचा फिफा विश्वचषक ११ जून ते १९ जुलैदरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे.

इराणचे क्रीडामंत्री अहमद दोन्यामाली यांनी “कोणत्याही परिस्थितीत इराण यंदाच्या फिफा विश्वचषकात सहभागी होऊ शकत नाही,” असं वक्तव्य केलं होतं. यानंतर एक दिवसातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. अमेरिकेच्या सहआयोजकत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेत इराणच्या फुटबॉल संघाने सहभागी होणं “योग्य ठरणार नाही,” असं ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितलं. तसेच अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे खेळाडूंच्या “स्वतःच्या जीवित आणि सुरक्षेच्या दृष्टीने” त्यांनी स्पर्धेत सहभागी होऊ नये, असंही त्यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला फिफा विश्वचषकात न खेळण्याचा सल्ला

“इराण राष्ट्रीय फुटबॉल संघाचे विश्वचषकात स्वागत आहे. पण त्यांच्या स्वतःच्या जीवित आणि सुरक्षिच्या दृष्टीने त्यांनी स्पर्धेत खेळणं योग्य आहे, असे मला खरोखर वाटत नाही.” असं ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं हे वक्तव्य मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांना दिलेल्या संदेशापेक्षा काहीसं वेगळं असल्याचं दिसत आहे. इन्फांटिनो यांनी नंतर सार्वजनिकरित्या सांगितलं होतं की, ट्रम्प यांनी इराणच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे विश्वचषकात स्वागत करण्यात येईल, अशी हमी दिली होती. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, खाजगी चर्चांबाबत बोलण्यासाठी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका व्हाईट हाऊस अधिकाऱ्यानेही ट्रम्प यांनी इन्फांटिनो यांना इराणच्या सहभागाबाबत सकारात्मकता दर्शवल्याचं सांगितलं.

दरम्यान, गुरुवारी व्हाईट हाऊसने ट्रम्प यांनी “त्यांच्या स्वतःच्या जीवित आणि सुरक्षेच्या दृष्टीने” असा उल्लेख नेमका कशासाठी केला होता, याबाबत स्पष्टीकरण दिलं नाही. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेत असताना इराणी संघाला कोणताही धोका निर्माण होऊ शकतो का, याबाबत त्यांनी इशारा दिला होता का, याबाबतही स्पष्टता करण्यात आली नाही. इराणचा संघ १५ जून रोजी कॅलिफोर्नियातील इंग्लवूड येथे न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार आहे. त्यानंतर २१ जूनला बेल्जियमविरुद्ध सामना होणार असून, २६ जूनला सिएटल येथे इजिप्तविरुद्ध सामना खेळत ते गट टप्प्यातील आपला प्रवास पूर्ण करणार आहेत.

जून महिन्यापासून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कठोर स्थलांतर धोरणाचा भाग म्हणून इराणवर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या नियमांमधून खेळाडू आणि प्रशिक्षकांना सूट देण्यात आली असल्यामुळे इराणचा फुटबॉल संघ अमेरिकेत प्रवेश करू शकतो. दरम्यान, इराणचे क्रीडामंत्री अहमद दोन्यामाली यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यामुळे आधुनिक काळातील फुटबॉल विश्वचषकातून एखादा संघ माघार घेण्याची शक्यता प्रथमच निर्माण झाली असल्याचं वृत्त ‘रॉयटर्स’ने दिलं आहे.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण प्रदेशात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून ती अजूनही शांत झालेली नाही. अशा परिस्थितीत इराणसाठी विश्वचषकात सहभागी होणं अशक्य असल्याचं दोन्यामाली यांनी स्पष्ट केलं. यजमान देशांपैकी एका देशाशी युद्ध सुरू असताना इराणने विश्वचषकात सहभागी होणं सुरुवातीपासूनच विसंगत वाटत होतं. तरीही मंगळवारीपर्यंत फिफा संघटना इराणचा संघ १५ जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या गट सामन्यात उतरतील, अशी अपेक्षा व्यक्त करत होती.

जर इराणने स्पर्धेतून माघार घेतली, तर विश्वचषकाच्या नियमावलीतील कलम ६ नुसार त्यावर आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. तसेच रिक्त झालेल्या जागेसाठी कोणत्याही दुसऱ्या देशाला संधी देण्याचा अधिकार फिफाकडे असेल.