डोनाल्ड ट्रम्प आणि वाद नवीन नाहीत. पण या खेपेस ट्रम्प यांनी थेट फुटबॉलच्या मैदानात वाद घडवून आणलाय. अमेरिकेचा खेळाडू फोलारिन बालोगनला बोस्निया हर्झेगोविनाविरुद्धच्या लढतीत रेड कार्ड दाखवण्यात आलं. रेड कार्ड नियमानुसार, त्याच्यावर एका सामन्यापुरती बंदी आली. यामुळे सोमवारी होणाऱ्या अमेरिकेच्या बेल्जियमविरुद्धच्या लढतीत तो खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. हा प्रकार लक्षात येताच वर्ल्डकपच्या यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट फिफाचे प्रमुख जिआनी इन्फॅन्टिनो यांना कॉल केला. ट्रम्प आणि इन्फॅन्टिनो म्हणजेच पर्यायाने व्हाईट हाऊस आणि फिफा यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर काही तासात बालोगन याच्यावरील एका सामन्याची बंदी हटवण्यात आली आहे. रेड कार्डानंतर एका सामन्याची बंदी हा नियम आहे. मात्र जागतिक महासत्तेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी थेट फिफालाच नियम वाकवायला लावला आहे. यामुळे ट्रम्प यांच्यावर टीका होते आहे आणि जोरदार ट्रोलिंगही होत आहे.

वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत १८९ रेड कार्ड दाखवण्यात आली आहेत. याआधी फक्त एकदा रेड कार्ड दाखवण्यात आलेल्या खेळाडूला पुढच्या सामन्यात खेळता आलं होतं. १९६२ मध्ये चिलीविरुद्ध ब्राझीलच्या गरिन्चाला रेड कार्ड दाखवण्यात आलं. मात्र त्यानंतरही चेक रिपब्लिकविरुद्धच्या फायनलच्या मुकाबल्यात गरिन्चा खेळला होता. मात्र तेव्हाच्या फिफाच्या नियमानुसार रेड कार्डचा अर्थ एका सामन्यापुरतं निलंबन असा नव्हता. तांत्रिक समिती आणि सामन्याशी निगडीत तंत्रज्ञ यांनी मिळून रेड कार्डचा निर्णय घेतला होता.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ११ खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आलं आहे. त्यापैकी प्रत्येकाला पुढच्या सामन्यात खेळता आलेलं नाही. मग अमेरिकेच्या बालोगनला नियमात सूट का? असा सवाल केला जात आहे. फिफाने यासंदर्भात काहीही औपचारिक भाष्य केलेलं नाही. दरम्यान संघांना रेड कार्डविरोधात दाद मागण्याचा अधिकार नाही. फिफाने बालोगनचं एका सामन्यापुरतं निलंबन रद्द करताना नियम २७चा उल्लेख केला. या नियमानुसार फिफाला खेळाडूवरील बंदी हटवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

कोणतंही कारण न देता निलंबन हटवण्याच्या किंवा कमी करण्याच्या या नियमावरही जोरदार टीका होते आहे. वर्ल्डकप स्पर्धेत याआधी नियम २७चा कधीही वापर करण्यात आलेला नाही.

फिफाच्या एथिक्स समितीने याप्रकाराची दखल घेतली असून इन्फॅन्टिनो यांच्या निर्णयाची चौकशी करावे असे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांना फिफाचा शांततेसाठीचा पुरस्कार देताना राजकीय तटस्थता न राखल्याचा आरोप इन्फॅन्टिनो यांच्यावर आहे. फिफाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपाला स्थान नाही. यासंदर्भात कठोर नियम आहेत.