वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील फुटबॉल संघटनांनी ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्यांना भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. इन्फान्टिनो यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा विचार करणेही घोडचूक ठरेल, असे ट्रम्प म्हणाले. इन्फान्टिनो यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पार पडलेला विस्तारित ‘फिफा’ विश्वचषक हा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी विश्वचषक असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी त्यांचे जोरदार समर्थन केले.

इन्फान्टिनो यांच्या अध्यक्षपदाभोवतीचे वाद ‘फिफा फॉरवर्ड एंटरप्राइज’ या प्रस्तावामुळे अधिक तीव्र झाले. ‘फिफा’शी संबंधित स्पर्धांमध्ये, विशेषत: विश्वचषकात, खासगी क्षेत्राचा सहभाग आणि गुंतवणूक वाढवण्याचा या योजनेचा उद्देश होता. मात्र, या प्रस्तावाला जगभरातील फुटबॉल संघटनांकडून विरोध झाला. युरोपीयन फुटबॉल महासंघ (युएफा), उत्तर-मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल महासंघ (कॉनकाकाफ), तसेच आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) यांनी ‘फिफा’च्या प्रस्तावाला विरोध दर्शवला. वाढत्या दबावानंतर ‘फिफा’ने अखेर हा प्रस्ताव मागे घेतला. मात्र, त्यानंतरही इन्फान्टिनो यांच्यावरील नाराजी कायम आहे. या खंडीय संघटनांनी इन्फान्टिनो आणि ‘फिफा’वर ‘फसवणूक’ आणि ‘विश्वासभंग’ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. परंतु ट्रम्प यांनी इन्फान्टिनो यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

‘‘फिफाने कोणत्याही कारणास्तव इन्फान्टिनो यांना पदावरून हटवण्याचा विचार केला, तर ती घोडचूक ठरेल. ते शानदार काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी विश्वचषक झाला. ते नसतील तर विश्वचषक पुन्हा कधीही इतका यशस्वी किंवा नफ्याचा ठरणार नाही,’’ असे ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर लिहिले. अमेरिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान ट्रम्प आणि इन्फान्टिनो यांच्यातील वाढलेली जवळीक फुटबॉलविश्वात चर्चेचा विषय ठरली होती. त्यातच ट्रम्प यांच्या जावयाच्या भावाच्या कंपनीचे ‘फिफा’च्या वादग्रस्त हिस्सा विक्रीच्या योजनेत महत्त्वाचे स्थान असल्याचे समोर आल्याने प्रश्न आणखी वाढले. मात्र, या योजनेबाबत इन्फान्टिनो यांच्याशी आपण चर्चा केली नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.