ऑस्ट्रेलियन गोलंदाज सामन्याआधीच घाबरली; म्हणाली स्मृती-शफालीसमोर गोलंदाजीच करणार नाही

टी-२० विश्वचषकात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. हा सामना रद्द झाल्यानंतर, गटात अव्वल क्रमांक मिळवल्याच्या निकषावर भारतीय संघाला अंतिम फेरीचं तिकीट देण्यात आलं. दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियन महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र ऑस्ट्रेलियन संघाची प्रमुथ गोलंदाज मेगन स्कट, भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलीच घाबरलेली आहे. स्मृती आणि शफालीसमोर मी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीच करणार नसल्याचं स्कटने म्हटलंय.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्टकने १७ धावांत २ बळी घेत महत्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे भारतीय संघाच्या सलामीवीर सध्या आक्रमक खेळ करतायत. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सुरुवातीच्या षटकांमध्ये करत असलेली फटकेबाजी पाहून अनेक गोलंदाजांना घाम फुटला होता. “मला भारताविरोधात खेळायला आवडत नाही, भारतीय फलंदाज सध्या चांगल्याच फॉर्मात आहेत. स्मृती आणि शफाली माझ्या गोलंदाजीवर चांगल्या खेळतात. तिरंगी मालिकेत शफालीने माझ्या गोलंदाजीवर ठोकलेला षटकार हा माझ्या दृष्टीने सर्वोत्तम होता. माझ्या गोलंदाजीवर कोणत्याही फलंदाजाने आजवर मला इतका उंच षटकार मारलेला नाही. या दोघींविरोधात आम्ही रणनिती आखत आहोत, पण माझ्यामते मी या दोघांविरोधात गोलंदाजी करण्यासाठी योग्य नाही, निदान पॉवरप्लेमध्ये नाहीच नाही. दोन्ही फलंदाज माझी गोलंदाजी व्यवस्थित खेळतात.” स्कट आयसीसीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.

८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला सध्या चांगला खेळ करत आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचं पारडं जड असणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dont wanna bowl to verma mandhana during powerplay oz pacer megan schutt wary of hammering psd