महाराष्ट्र खो-खोसाठी गुरुवार हा जणू ‘सोनियाचा दिनू’च ठरला. यजमान केरळचे कडवे आव्हान मोडीत काढत महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

थिरुअनंतपूरम्च्या श्रीपादम स्टेडियमवर झालेल्या या स्पध्रेतील महिलांच्या रोमांचक अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळवर ११-१० अशी केवळ एक गुणाने मात करून विजेतेपद पटकावले व २०११च्या राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेतील पराभवाचा वचपा काढला. केरळने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले, मध्यंतराला महाराष्ट्राकडे एका गुणाची आघाडी होती. सारिका काळे (१.५० मि. व २.२० मि.), प्रियांका येळे (२.४० मि. व १.३० मि.), श्रुती सकपाळ (१.२० मि. व १.२० मि., ऐश्वर्या सावंत (२.०० मि.), श्वेता गवळी दोन्ही डावांत नाबाद, शीतल भोर (४ गडी) व शिल्पा जाधव (२ गडी) यांनी विजयश्री खेचून आणली. केरळकडून वर्षां एस. (२.२० मि. व २ मि.), दिव्या (१.२० मि. व २.१० मि.), सौम्या व रेखामोल (प्रत्येकी ३ गडी) यांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केला.
महाराष्ट्राच्या पुरुषांनी अंतिम फेरीत केरळचा १४-१२ असा दोन गुण व ५.१० मि. राखून दणदणीत पराभव केला. अमोल जाधव (२.१० मि., ०.५० मि. नाबाद व ३ गडी), दिपेश मोरे (१.३० मि., २.२० मि. व २ गडी), युवराज जाधव (४ गडी), नरेश सावंत (१.२० मि. व १.१० मि.), उमेश सातपुते (२ मि.), मनोज पवार (२ मि.) तसेच बाळासाहेब पोकार्डे (२ गडी) हे विजयाचे प्रमुख शिलेदार होते.
प्रार्थनाची आगेकूच
प्रार्थना ठोंबरे हिने येथील महिलांच्या टेनिसमध्ये अपराजित्व राखले. तिने स्थानिक खेळाडू आर.आर.जॉन हिचा ६-०, ६-१ असा दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राच्याच मिहिका यादव हिने हरयाणाच्या जेनिफर लुखियामो हिचा ६-४, ६-४ असे सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केले.