टी२० वर्ल्डकपमध्ये बुधवारचा दिवस डबल सुपर ओव्हरने गाजला. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान सामना निर्धारित षटकात टाय झाला. त्यानंतर पहिली सुपर ओव्हरही टाय झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये पारडं अफगाणिस्तानच्या बाजूने होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने दडपणाच्या क्षणी शांतचित्ताने खेळ करत बाजी मारली.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावांचा डोंगर उभारला. रहमानुल्ला गुरबाझच्या ८४ धावांच्या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने धावांचा पाठलाग केला. मात्र सामना टाय झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ट्रिस्टन स्टब्जच्या षटकाराच्या बळावर सुपर ओव्हर टाय केली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने २३ धावा केल्या. गुरबाझने केशव महाराजच्या गोलंदाजीवर तीन सलग षटकार चोपले. एका चेंडूत ६ धावा आवश्यक असताना महाराजने वाईड टाकला. एका चेंडूत ५ धावा हव्या असताना गुरबाझ बाद झाला. डेव्हिड मिलरने सुरेख झेल टिपला.
टी२० वर्ल्डकपमध्ये दुसरी सुपर ओव्हर होण्याचा ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या सुपर ओव्हरच्या नियमांसंदर्भात चाहत्यांमध्ये संभ्रम दिसून आला.
दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणाला गोलंदाजी करता येते?
सुपर ओव्हरच्या नियमानुसार एखाद्या गोलंदाजाने सुपर ओव्हर टाकल्यास, त्याला त्या सामन्यात पुन्हा सुपर ओव्हर टाकता येत नाही. यामुळे दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान सामन्यात लुंगी एन्गिडी आणि फझलक फरुकी दुसरी सुपर ओव्हर टाकू शकले नाहीत. दोन्ही गोलंदाजांनी सुपर ओव्हरमध्ये प्रत्येकी १७ धावा दिल्या. त्यामुळे सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला. पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यामुळे एन्गिडी आणि फरुकी यांचं सामन्यातलं काम आटोपलं. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अझमतुल्ला ओमरझाई आणि केशव महाराज यांनी गोलंदाजी केली.
सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी कोण करतं?
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीचा क्रम बदलतो. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ज्या संघाने प्रथम फलंदाजी केलेली असते त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागते. मूळ सामना टाय झाला. दक्षिण आफ्रिकेने मूळ सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेने सुपर ओव्हर टाय केली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी केली. दोन्ही संघांना समान संधी मिळावी यासाठी हे तत्व लाग करण्यात आलं आहे. एखादा संघ सुपर ओव्हरमध्ये लागोपाठ फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही
सुपर ओव्हरमध्ये बाद झाल्यास पुन्हा फलंदाजी करता येते का?
आयसीसीच्या नियमांनुसार सुपर ओव्हरमध्ये बाद झालेला फलंदाज पुन्हा सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही. सुपर ओव्हर सुरू होण्यापूर्वी, तीन फलंदाजांची यादी सामनाधिकाऱ्यांना सादर करावी लागते. सुपर ओव्हरमध्ये नाबाद राहिलेले तसंच फलंदाजाची संधी न मिळालेले फलंदाज पुढच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकतात. फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यास त्याला पुन्हा फलंदाजाची संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिस बाद झाला. त्यामुळे नियमानुसार त्याला पुढच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही. डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्ज हे दोघे नाबाद राहिल्यामुळे त्यांना पुढच्या सुपर ओव्हरमध्ये खेळायची संधी मिळाली.
अफगाणिस्तानच्या रहमनुल्ला गुरबाझने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार मारला असता तर?
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला शेवटच्या चेंडूवर ६ धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने टाकलेला चेंडू वाईड गेला. त्यामुळे अफगाणिस्तानचं लक्ष्य एका धावेनं कमी झालं. त्यांना एका चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती. गुरबाझने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला असता तर दुसरी ओव्हरही टाय झाली असती. नियमानुसार, सामन्याचा निर्णय ठरवण्यासाठी तिसरी सुपर ओव्हर खेळवावी लागली असती. जोवर सामन्याचा निर्णय लागत नाही तोवर सुपर ओव्हर खेळवण्यात येतील

