२०२५ मध्ये अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटला अलविदा केलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, निकोलस पुरन या खेळाडूंनी क्रिकेटच्या काही फॉरमॅटला अलविदा केलं, ज्यामुळे नक्कीच एका पर्वाचा अंत झाला. दरम्यान हे वर्ष सरताना अजून एका क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचा भाऊ व वडील देखील राष्ट्रीय संघातून क्रिकेट खेळले आहेत.

न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू डग ब्रेसवेलने ३५व्या वर्षी सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून न्यूझीलंडच्या कसोटी संघाबाहेर होता आणि त्याच्या जागी अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्याने २०२३ मध्ये न्यूझीलंड संघाकडून अखेरचा कसोटी सामना खेळला होता. गेल्या बऱ्याच काळापासून दुखापतींशी झुंजत असल्याने त्याला पुनरागनमनाची संधी मिळाली नाही.

डग ब्रेसवेलच्या निवृत्तीची बातमी न्यूझीलंड क्रिकेट संघाने पोस्ट शेअर करत दिली. डग ब्रेसवेलने निवृत्ती जाहीर करताना म्हटलं, क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक तरुण खेळाडू म्हणून, क्रिकेट खेळणं हे माझं स्वप्न होतं. क्रिकेटमुळे मला मिळालेल्या संधींसाठी मी नेहमीच आभारी राहीन. माझ्या कारकिर्दीत मला सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स तसेच माझ्या देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं हा एक कमालीचा अनुभव आहे आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा मी खूप आभारी आहे.

क्रिकेटचा वारसा असणाऱ्या घराण्यातील खेळाडू

डग ब्रेसवेल हा एका क्रिकेटचा इतिहास असलेल्या कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील ब्रेंडन आणि काका जॉन हे दोघेही क्रिकेटपटू होते आणि त्यांनी न्यूझीलंड संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये संघाचं प्रतिनिधीत्त्व केलं आहे. याशिवाय जॉन यांनी न्यूझीलंडसाठी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे. डगचा चुलत भाऊ मायकेल ब्रेसवेल देखील क्रिकेट खेळतो आणि भारत दौऱ्यावर न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

डग ब्रेसवेलने न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळलं आहे, त्याने २०११ मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने २८ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ७४ विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये २६ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २० विकेट्स आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ७४ सामने खेळले.

२०११ मध्ये होबार्ट येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या न्यूझीलंडच्या शेवटच्या कसोटी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या डावात त्याने सहा विकेट्स घेतल्या, ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी कामगिरी होती.