Delhi Premier League 2026 Umpire Hit On Face Video: आपण क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा पंचांना चेंडू लागल्याचे व्हिडीओ पाहिले आहेत, तसाच एक व्हिडीओ दिल्ली प्रीमियर लीगमधील एका सामन्यातील व्हायरल होत आहे. दिल्ली प्रीमियर लीग २०२६ च्या ३०व्या सामन्यादरम्यान काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. हा सामना ईस्ट दिल्ली रायडर्स आणि न्यू दिल्ली टायगर्स यांच्यात खेळला जात होता. न्यू दिल्ली टायगर्सचा फलंदाज लक्ष्य थरेजा याने एक जोरदार ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ मारला; चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागल्याने दिशा बदलली आणि थेट पंचांच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाज आशिष मीना याच्या एका चेंडूचा फटका अंपायरला बसला. उजव्या हाताचा फलंदाज लक्ष्य याने पुढे सरसावून गोलंदाजाच्या चेंडूवर जोरदार फटका मारला; मात्र, चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागल्याने चेंडूची दिशा बदलली आणि थेट अंपायरच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. या घटनेमुळे फलंदाज पुरता हादरून गेला आणि त्याने धक्क्याने आपले डोकं धरलं.

पंचानी त्वरित मदतीसाठी खूण केली. परिणामी, सामन्यादरम्यान पंच मैदानाबाहेर गेले आणि त्यांच्या जागी दुसरे पंच मैदानात आले सुदैवाने, चेंडू गालावर लागल्यामुळे पंचांच्या तोंडातून रक्त आलं नाही; अन्यथा, त्यांना गंभीर दुखापत झाली असती. सामन्यांदरम्यान पंचांना अनेकदा दुखापत होते; म्हणूनच अनेक पंच मैदानात हेल्मेट घालून उतरणं पसंत करतात.

काही क्रिकेट सामन्यांदरम्यान चेंडू लागल्यामुळे पंचांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१९ मध्ये वेल्समधील पेम्ब्रोक आणि नार्बेथ यांच्यातील एका सामन्यादरम्यान, एका पंचाच्या डोक्याला चेंडू लागला; त्यांना ‘इंड्युस्ड कोमा’मध्ये म्हणजेच औषधांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या कोमात ठेवण्यात आलं होतं आणि एका महिन्यानंतर रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यानंतर २०१४ मध्ये, इस्रायल क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि नंतर पंच बनलेले अश्दोद एका लीग सामन्यात पंच म्हणून काम करत होते. फलंदाजाच्या एका फटक्यामुळे चेंडू स्टंप्सवर आदळून उसळला आणि त्यांना लागला; त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

२००९ मध्ये ॲलन जेन्किन्स हे वेल्समधील स्वान्सी येथील सेंट हेलेन्स मैदानावर एका लीग सामन्याचे पंच म्हणून काम पाहत होते. क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू त्यांच्या डोक्याला लागल्याने ते बेशुद्ध पडले आणि नंतर रुग्णालयात त्यांचे निधन झाले.