scorecardresearch

“रात्री दहा पेग दारू प्यायली, दुसऱ्या दिवशी ठोकलं दमदार शतक” विनोद कांबळीचा खुलासा

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भलताच खुलासा केला आहे.

“रात्री दहा पेग दारू प्यायली, दुसऱ्या दिवशी ठोकलं दमदार शतक” विनोद कांबळीचा खुलासा
संग्रहित फोटो

मुंबईच्या मातीतून आतापर्यंत देशाला अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू मिळाले आहेत. अशा क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडीचा समावेश होतो. मात्र, सचिनला ज्याप्रमाणात यश आणि प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी विनोदला मिळाली नाही. कधीकाळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारा विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करतोय.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मात्र भलताच खुलासा केला आहे. रणजी सामना सुरू असताना विनोद कांबळीने सुमारे १० पेग दारू प्यायली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी विनोद कांबळी उठेल की नाही? याची चिंता तत्कालीन रणजी संघाचे कोच बलविंदर सिंग संधू यांना सतावत होती. पण विनोद कांबळीने आदल्या रात्री १० पेग दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकलं होतं, असा खुलासा विनोद कांबळीने स्वत: केला आहे.

३० हजार रुपयांच्या निवृत्ती वेतनावर सुरू आहे उदरनिर्वाह…
विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे ३० हजार रुपये निवृत्ती वेतन हा कांबळीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. “मी एक निवृत्त क्रिकेटपटू आहे. मी सध्या पूर्णपणे बीसीसीआयच्या निवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. त्यासाठी मी खरोखर मंडळाचा आभारी आणि कृतज्ञ आहे. निवृत्तीवेतनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत आहे,” असे कांबळीने ‘मिड-डे’ला एका मुलाखतीत सांगितले आहे.

हेही वाचा- “मी सचिनकडून अपेक्षा ठेवणं…”; विनोद कांबळी करतोय आर्थिक संकटाचा सामना

आपण सचिन तेंडुलकरकडून मदत का नाही घेत, याबाबद्दलही कांबळीने सांगितले आहे. कांबळी म्हणाला, “सचिनला सर्व काही माहित आहे. पण, मला त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीमध्ये काम दिले होते. मला तेव्हा खूप आनंद झाला होता. तो खूप चांगला मित्र आहे. तो नेहमीच माझ्यासाठी उपलब्ध असतो. शाळेत असल्यापासून त्याने माझी मदत केली.”

काम करण्यासाठी कांबळी तयार
“मला कामाची गरज आहे. मी तरुणांसोबत काम करायला तयार आहे. मुंबईने अमोल मुझुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. पण, गरज भासली तर मला संधी द्यावी. मला मुंबईच्या संघासोबत काम मिळावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मागे माझे कुटुंब आहे, त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला काहीतरी काम द्यावे”, असे विनोद कांबळी म्हणाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drink 10 peg hard liquor scored hundred next day former cricketer vinod kambli rmm