दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केलेल्या भारताने दुसऱ्या सामन्यात केनियावर ४८-१९ अशा मोठ्या फरकाने मात केली. भारताकडून चढाईत रिशांक देवाडीगा, मोनू गोयत यांनी प्रत्येकी १० गुणांची कमाई केली. तर बचावफळीत गिरीश एर्नाक आणि संदीप नरवालने आपला ठसा उमटवला.

२०१६ साली पार पडलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेनंतर केनियाच्या संघाने आपल्या खेळात बऱ्याच प्रमाणात सुधारणा केलेली पहायला मिळाली. विशेष करुन डाव्या-उजव्या कोपऱ्यावरुन केलेल्या पकडी, कर्णधार डेव्हीड मोसंबाईकडून चढाईमधली चपळता या सर्व गोष्टी वाखणण्याजोग्या होत्या. भारतीय संघाचे प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी आणि कर्णधार अजय ठाकूर यांनीही केनियाच्या कामगिरीचं कौतुक केलं.

केनियाने आपल्या खेळात सुधारणा केली असली, तरीही प्रत्यक्ष सामन्यात भारताने सामन्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. चढाई आणि बचावात अव्वल दर्जाचा खेळ करत भारतीय संघाने केनियाला एकामागोमाग एक धक्के देणं सुरुच ठेवलं. सामन्यात अखेरच्या सत्रापर्यंत भारताने आपला धडाकेबाज खेळ सुरु ठेवला, या जोरावर केनियावर मात करुन भारताने स्पर्धेतला दुसरा विजय संपादन केला.