कोईम्बतूर : जयदेव उनाडकट आणि अतित शेठ वगळता गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीचा पश्चिम विभागाच्या संघाला फटका बसला. बाबा इंद्रजितने (१२५ चेंडूंत ११८ धावा) झुंजार खेळी करत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण विभागाला आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या दिवशी ८ बाद २५० धावांवरून पुढे खेळणाऱ्या पश्चिम विभागाचा पहिला डाव २७० धावांत आटोपला. मग दिवसअखेर दक्षिण विभागाने ७ बाद ३१८ अशी मजल मारली. त्यामुळे त्यांच्याकडे ४८ धावांची आघाडी होती.

पश्चिम विभागाने अखेरचे दोन गडी केवळ २० धावांत गमावले. हेत पटेलने १८९ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ९८ धावांची खेळी केली. दक्षिण विभागाचा डावखुरा फिरकीपटू साई किशोरने ८६ धावांत पाच गडी बाद केले. मग दक्षिण विभागाने ठरावीक अंतराने गडी गमावले. मयांक अगरवाल (३१) आणि कर्णधार हनुमा विहारी (२५) या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वेगवान गोलंदाज अतितने बाद केले. तर रोहन कुन्नुमल (३१) उनाडकटच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर मात्र इंद्रजितने मनीष पांडे (४८) आणि कृष्णप्पा गौतम (४३) यांच्या साथीने दक्षिण विभागाला आघाडी मिळवून दिली.