वृत्तसंस्था, बंगळूरु : दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मध्य विभाग आणि पूर्व विभाग आमनेसामने येणार असून आज, रविवारपासून सुरू होणार्‍या या लढतीत अनुभवी रजत पाटीदार आणि युवा वैभव सूर्यवंशी यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. गतविजेत्या मध्य विभागाचे सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य आहे.

पाटीदारच्या नेतृत्वाखाली मध्य विभागाचा संघ यंदाही मजबूत दिसत आहे. गेल्या वर्षी विजेतेपद मिळवणार्‍या संघातील प्रमुख खेळाडू कायम आहेत. पाटीदार स्वत: अलीकडील स्पर्धांमध्ये सातत्याने धावा करत असून, त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. रिंकू सिंहच्या अनुभवामुळे मधल्या फळीला आणखी बळ मिळेल. विदर्भाचा फिरकीपटू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज यश ठाकूर यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल. फिरकी गोलंदाजीत दुबेला ऑफ-स्पिनर सारांश जैनची साथ लाभेल.

दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नसली, तरी त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा कायम आहे. उपांत्यपूर्व सामन्यात पूर्व विभागाने ईशान्य विभागाचा एक डाव आणि २१० धावांनी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली.

सुदीप घरामी आणि शाहबाज अहमद यांच्या शतकांमुळे फलंदाजी भक्कम झाली, तर अनुकूल रॉय आणि अभिजित सरकार यांनी गोलंदाजीत प्रभाव पाडला. कर्णधार इशान किशन आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्यामुळे संघाला स्थैर्य लाभले आहे. दुसर्‍या उपांत्य सामन्यात तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील दक्षिण विभागासमोर उत्तर विभागाचे आव्हान असेल. उत्तरेने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य पश्चिम विभागावर ५२ धावांनी मात केली होती.

  • वेळ : सकाळी ९.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स खेल, जिओहॉटस्टार ॲप.