Shashi Tharoor On Team India Defeat: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा जिंकल्यानंतर बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढलं आणि नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली. ज्या भारतीय संघाचा गेल्या काही वर्षांपासून टी-२० क्रिकेटमध्ये दबदबा राहिला आहे. तो पूर्णपणे संपताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने एकही मालिका गमावली नव्हती. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाने लागोपाठ २ मालिका गमावल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शेअर केलेली एक पोस्ट तुफान चर्चेत आहे.

शशी थरूर यांनी अनेकदा क्रिकेटबाबत आपलं मत पोस्ट शेअर करुन व्यक्त केलं आहे. भारतीय संघाने जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी केली आहे, तेव्हा त्यांचं कौतुक केलं आहे. तर जेव्हा फ्लॉप कामगिरी केली आहे, तेव्हा टीका देखील केली आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका २-० ने गमावल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धची मालिकाही भारतीय संघाने गमावली आहे. भारताच्या पराभवानंतर रात्री १ वाजून ५१ मिनिटांनी शशी थरुर यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी खरोखरच अवाक झालो आहे. थक्क झालो आहे. चकित झालो आहे. हा अपमान तर मर्यादेच्या पलीकडचा आहे. खरं सांगायचं तर, आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही.”

भारतीय संघाचा दारुण पराभव

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माची सलामी जोडी पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. वैभव १५ तर अभिषेक अवघ्या १६ धावांवर माघारी परतला. तर इशान किशन अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. शिवम दुबेने २२ आणि उपकर्णधार तिलक वर्माने ११ धावांची खेळी केली. यादरम्यान कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत ४९ चेंडूंमध्ये नाबाद ८० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १५९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला जोस बटलर अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. तर फिल सॉल्टने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ५९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि १ षटकार खेचला. तर कर्णधार हॅरी ब्रूकने ३५ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ७९ धावांची खेळी केली आणि इंग्लंडला ९ गडी राखून एकतर्फी विजय मिळवून दिला.