Dwayne Bravo Ajinkya Rahane Viral Video: आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होण्यापूर्वी, सर्व फ्रँचायझींच्या पत्रकार परिषद पार पडत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक, मेन्टॉर आणि कर्णधार यांनी २० मार्चला एक पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी आपल्या संघाच्या प्रगतीबद्दल आणि इतर सर्व मुद्द्यांबाबत चर्चा करत माहिती दिली. मात्र, या पत्रकार परिषदेदरम्यान, केकेआरचा मेन्टॉर ड्वेन ब्राव्होच्या एका वाक्याने वाद पेटला आहे.
ड्वेन ब्राव्हो व अजिंक्य रहाणे पत्रकार परिषदेसाठी बसले असताना एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान ब्राव्होचं असं काही सीक्रेट बाहेर आलं की त्याला माईक सुरू असल्याचं कळताच तो क्षणात मागे झाला, हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, पत्रकार परिषदेत जे काही घडलं ते नकळतपणे घडलं.
शेन वॉटसन, मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मेन्टॉर ड्वेन ब्राव्हो यांनी केकेआरच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी, ड्वेन ब्राव्हो आणि अजिंक्य रहाणे लवकर पोहोचून खुर्च्यांमध्ये बसले होते. त्यानंतर शेन वॉटसन व मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर येऊन बसले.
ड्वेन ब्राव्हो नेमकं काय म्हणाला?
अभिषेक नायर व वॉटसन बसल्यानंतर ब्राव्हो पुढे आला आणि वॉटसनला म्हणाला, “जेव्हा या लोकांनी मला कॉल केला, तेव्हा माझे दोन चिक्स (गर्लफ्रेंड) घरी होते.” ब्राव्होने चिक्स हा शब्द त्याच्या गर्लफ्रेंडससाठी वापरला जातो. ब्राव्हो पुढे काही बोलण्याआधीच, रहाणेचं लक्ष चालू असलेल्या माईककडे गेलं. त्याने लगेच ब्राव्होला सांगितलं की माईक चालू आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बोल, त्याचं बोलणं समोर ऐकू जातंय. रहाणेने हे बोलताच ब्राव्हो लगेच मागे झाला.
ब्रोवाच्या या व्हीडिओनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे. चाहते ब्राव्होला ट्रोल करत आहेत. तो मेंन्टॉर कसा काय झाला आणि उघडपणे असं कसं बोलू शकतो अशा कमेंट्स केल्या आहेत.
ड्वेन ब्राव्हो आयपीएल २०२५ दरम्यान मेन्टॉर म्हणून कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील झाला. यापूर्वी त्याने सीएसके (CSK) संघासोबत काम केलं होतं. ब्राव्होचा कोलकाता फ्रँचायझीसोबतचा करार सध्या आयपीएल २०२६ पर्यंत आहे. केकेआरमध्ये मेन्टॉर म्हणून, ब्राव्होची भूमिका रणनीती तयार करणं आणि विशेषतः गोलंदाजी विभागाला मार्गदर्शन करणं ही आहे. आयपीएलमधील केकेआर व्यतिरिक्त, ब्राव्हो सीपीएलमध्ये शाहरुख खानच्या फ्रँचायझी, ट्रिनबागो नाईट रायडर्सशी देखील जोडलेला आहे.
