भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेचे सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होण्याची शक्यता बळावली आहे. फिफाचे स्पर्धा संचालक झेव्हीयर केपी यांनी २०१७ मध्ये होणाऱ्या या स्पध्रेसाठीच्या सहापैकी चार स्टेडियमला तात्पुरती मान्यता दिल्याचे सांगितले. या चार स्टेडियममध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमचाही समावेश आहे. केपी यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दिली. तसेच २४ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
केपी म्हणाले, ‘‘ गेल्या आठवडय़ात आम्ही स्थानिक संघटनांशी चर्चा केली. या स्पध्रेसाठी आम्हाला सहा स्टेडियमची आवश्यकता असून त्यापैकी चार स्टेडियमला तात्पुरती मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमचा समावेश आहे. मात्र, फिफाने दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांची पूर्तता केल्यानंतरच सप्टेंबर २०१६मध्ये त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.’’ डी. वाय. पाटील स्टेडियमसह गुवाहाटी, कोलकाता आणि कोची यांना तात्पुरती मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित दोन स्टेडियमसाठी गोवा, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि पुणे शहर शर्यतीत आहेत.
 सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पध्रेमुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या इंडियन सुपर लीग स्पध्रेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता विश्वचषक स्पध्रेचे सामने पुढे ढकलण्याच्या वावडय़ांना केपी यांनी पूर्णविराम दिला. ‘‘ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पध्रेसाठीची युरोपियन पात्रता फेरी मेअखेरीस संपणार आहे आणि त्यामुळे दुसरी स्पर्धा घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबरपूर्वी ही स्पर्धा घेणे अशक्य आहे,’’ असे केपी यांनी स्पष्ट केले.
भारतासह या स्पध्रेत आशियातील चार देश, युरोपातील सहा देश, उत्तर अमेरिका-कॅरिबीनमधील चार देश, दक्षिण अमेरिकेतील व आफ्रिकेतील प्रत्येकी चार देश आणि ओशिनियातील एक देश सहभाग घेणार आहेत.
विश्वचषक स्पध्रेच्या यजमानपदासाठी आमची निवड होणे, हे मी भाग्य समजतो. ‘फिफा’, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल फेडरेशनचे आभार मानतो.
विजय पाटील, डी. वाय. पाटील अकादमीचे प्रमुख