East Zone vs South Zone, Duleep Trophy Final 2026: देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात इशान किशन ईस्ट झोन संघाचं नेतृत्व करत होता. संपूर्ण सामन्यात ईस्ट झोन संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. पहिल्या दिवसापासून ईस्ट झोन संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाने ७०८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना साऊथ झोन संघाला ३३६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ईस्ट झोन संघाने ३८८ धावा केल्या. शेवटी हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ईस्ट झोनचा संघ चॅम्पियन बनला आहे.

या स्पर्धेसाठी इशान किशनची ईस्ट झोन संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. त्याने हा विश्वास संपूर्ण स्पर्धेत सार्थ ठरवला. उत्तम नेतृत्व आणि दर्जेदार फलंदाजी करून तो आपल्या संघासाठी विजयाचा नायक ठरला. अंतिम सामन्यातील पहिल्या डावात त्याने २७० आणि दुसऱ्या डावात ८० धावांची खेळी केली. यासह दुलीप ट्रॉफी स्पर्धेत १३ वर्षानंतर ईस्ट झोन संघाने पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाने ७०८ धावांचा डोंगर उभारला होता. यादरम्यान इशान किशनने २७० धावांची वादळी खेळी केली. तर कुमार कुशाग्रने १०१ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या साऊथ झोन संघाकडून कर्णधार तिलक वर्माने ९९ धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. तर देवदत्त पडिक्कलने ६२ धावा केल्या. पण इतर कुठल्याही फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने साऊथ झोन संघाचा डाव अवघ्या ३३६ धावांवर आटोपला. यासह ईस्ट झोन संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना कुरेशीने ११६ धावा चोपल्या. तर इशान किशनने ८० धावा करून संघाची धावसंख्या ३८८ धावांपर्यंत पोहोचवली. निकाल लागू न शकल्याने दोन्ही कर्णधारांनी हात मिळवण्याचा निर्णय घेतला.

इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ईस्ट झोन संघाने १३ वर्षानंतर पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला आहे. या सामन्यात इशान किशनने ३५० धावा केल्या. यासह सामनावीर पुरस्कार पटकावला. यासह साऊथ झोन संघाचा कर्णधार तिलक वर्मा या स्पर्धेत मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.