इंडियन प्रीमिअर लीगमधील(आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाचे संघमालक अभिनेता शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि अभिनेत्री जुही चावला यांना परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने(ईडी) कारणे द्या नोटीस बजावली आहे. ईडीच्या नियम क्र.४(१) परकीय चलन व्यवस्थापनाअंतर्गत कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रा.लि. कंपनीच्या गौरी खान, शाहरुख खान आणि जुही चावला यांना नोटीस बजावण्यात आल्याचे ट्विट एनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.

 

कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्टस् प्रा. लि. आणि जय मेहता यांच्या मालकीची ‘सी आईसलँड इन्व्हेस्टमेंट’ या कंपन्यांमध्ये शेअर खरेदी-विक्री व्यवहार झाला होता. त्यावेळी केकेआरने ६०-७० रुपयांचे शेअर जय मेहतांना अवघ्या ६ ते ७ रुपयांना विकले होते. जय मेहता हे जुही चावलाचे पती असून केकेआरमधील भागीदारही आहेत. शेकडो कोटी रुपयांच्या या व्यवहारात परकीय चलन कायद्याचं उल्लंघन झाल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. त्यामुळे शाहरुख अडचणीत येण्याची शक्यता आहे.

येत्या ५ एप्रिलपासून आयपीएलच्या दहाव्या पर्वाला सुरूवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाला ऐनवेळी बसलेला हा धक्का समजला जात आहे. ईडीच्या नोटीसमुळे संघासमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.