कोलकात्यातील जगप्रसिद्ध ईडन गार्डन्स मैदानाचे माजी क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. यकृत आणि नैराश्य या आजारांसाठी त्यांना ११ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली, असे त्यांचे नातू प्रणय मुखर्जी यांनी सांगितले.
कोलकात्यातील क्रिकेट परंपरेनुसार क्रिकेट वर्तुळातील व्यक्तीच्या निधनानंतर पार्थिव अंत्यदर्शनाकरिता ईडन गार्डन्स येथे ठेवण्यात येते. मात्र प्रबीर यांनी तसे न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘२८ वर्षे ईडन गार्डन्सचे क्युरेटर म्हणून काम केल्यानंतरही योग्य वागणूक न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. यातूनच त्यांना नैराश्य आले होते. मला तिथे नेऊ नका, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्यात,’ असे प्रणय यांनी सांगितले.
स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध प्रबीर यांनी दोन दशकांहून अधिक काळ ईडन गार्डन्सचे क्युरेटर म्हणून काम पाहिले.