बाद फेरीसाठी बंगळुरू, तर साखळीसाठी रांची, धरमशाला, रायपूर शर्यतीत
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आयपीएलचे १३ सामने हलवण्याच्या निर्णयाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळवण्यात अपयशी ठरल्यास अंतिम सामना ईडन गार्डन्सला खेळवण्याची चिन्हे आहेत. या प्रतिष्ठेच्या सामन्याचे यजमानपद आम्ही सांभाळू शकतो, असे बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने हा सामना ईडन गार्डन्सला दिला, तर बंगाल क्रिकेटसाठी ती आनंदाची गोष्ट असेल, असे ‘कॅब’चे सचिव सुबिर गांगुली यांनी सांगितले.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज-इंग्लंड अंतिम सामना असे दोन महत्त्वाचे सामने बंगाल क्रिकेट असोसिएशनने यशस्वीपणे आयोजित करून दाखवले आहेत. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असे गांगुली म्हणाले.
महाराष्ट्रातील सामने हलवण्यात आल्यास बंगळुरू आणि कोलकाताच्या वाटय़ाला महत्त्वाचे सामने येऊ शकतील. या परिस्थितीत एलिमिनेटर आणि अंतिम सामना कोलकाता येथे आणि क्वालिफायरचे सामने बंगळुरूला होतील. किंग्ज इलेव्हन पंजाबचे नागपूरला होणारे तीन सामने आता मोहालीतच किंवा धरमशाला येथे होण्याची शक्यता आहे.
रांची आणि कटक या आणखी दोन ठिकाणी आयपीएलचे सामने झाले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर याआधी चेन्नई सुपर किंग्जचे सामने झाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या संघाचे सामने तिथे होऊ शकतात. याचप्रमाणे रायपूरला दिल्ली डेअरडेव्हिल्सचे दोन सामने होणार आहेत. ५० हजार क्षमतेचे हे मैदान आणखी एक पर्याय ठरू शकते. चेन्नईतील चेपॉकचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. मात्र तीन स्टँड्सच्या समस्येमुळे त्यांचा नाव चर्चेत येणे कठीण आहे.

ipl