Fifa World Cup Egypt vs Argentina Match Controversy: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध मिळालेल्या नाट्यमय पराभवानंतर इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन यांनी थेट जागतिक फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘फिफा’वरच गंभीर आरोप केले आहेत. “लियोनेल मेस्सी आणि गतविजेत्या अर्जेंटिनानं स्पर्धेत टिकून राहावं, अशीच फिफाची इच्छा होती,” असा दावा हसन यांनी केला असून, त्यांच्या या वक्तव्यामुळं फुटबॉल विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात इजिप्तला ३-२ अशा फरकानं पराभवाचा सामना करावा लागला होता. एका क्षणी इजिप्तनं सामन्यावर २-० अशी मजबूत पकड मिळवली होती. मात्र, अर्जेंटिनानं अवघ्या १३ मिनिटांत तीन गोल करत सामना त्यांच्या बाजूनं वळवला. या पराभवानं संतप्त झालेल्या इजिप्तच्या गोटातून आता थेट फिफाच्या पक्षपातीपणावर बोट ठेवलं जात आहे.
अवघ्या १३ मिनिटांत सामना फिरला; इजिप्तचं स्वप्न भंगलं
विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या उलटफेराच्या दिशेने इजिप्तची वाटचाल सुरू होती. सामन्याच्या उत्तरार्धापर्यंत इजिप्तनं २-० अशी आघाडी घेत जागतिक विजेत्यांना बॅकफूटवर ढकललं होतं. मात्र, त्यानंतर ख्रिस्तियन रोमेरो, लिओनेल मेस्सी आणि एन्झो फर्नांडिस या तिघांनी अवघ्या १३ मिनिटांत प्रत्येकी एक गोल करत अर्जेंटिनाला ३-२ असा विजय मिळवून दिला आणि अर्जेंटिनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
या धक्कादायक पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना होसाम हसन यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही मैदानात प्रत्येक बाबतीत गतविजेत्यांपेक्षा सरस होतो. पण सामन्याचा निकाल मैदानावरील अंतर्गत आणि मैदानावहेरील बाह्य घटकांनी निश्चित केला.”
“कदाचित त्यांना जागतिक विजेत्यांना स्पर्धेत पुढं न्यायचे होतं. मेस्सीने शर्यतीत राहावं, अशी त्यांची इच्छा असावी. फुटबॉलमध्ये कधीकधी तांत्रिक गोष्टींपेक्षा बाह्य शक्ती अधिक कार्यरत असतात. गतविजेत्या अर्जेंटिनाला प्रत्येक पातळीवर मदत करण्यात आली,” असा थेट आरोप हसन यांनी केला.
VAR च्या निर्णयांवरून इजिप्तचा संताप
सामन्यादरम्यान ‘व्हिडिओ असिस्टंट रेफ्री’ (VAR) च्या काही वादग्रस्त निर्णयांवरून इजिप्तच्या संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सामन्याच्या ५९ व्या मिनिटाला इजिप्तच्या मोस्तफा झिकोचा एक गोल ‘VAR’ने बाद ठरवला. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरल्याचं हसन यांचं म्हणणं आहे.
याशिवाय, स्टार खेळाडू मोहम्मद सालाहला पेनल्टी बॉक्समध्ये पाडण्यात आल्यानंतरही पेनल्टी नाकारण्यात आली. तसेच, सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्येही एन्झो फर्नांडिसने केलेल्या विजयी गोलच्या वेळी अलेक्सिस मॅक अलिस्टरने फाऊल केला होता, ज्याकडे रेफ्रींनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा दावा इजिप्तनं केला आहे.
हसन पुढे म्हणाले, “अर्जेंटिनाच्या बाजूनं दबावाचं राजकारण केलं जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आम्ही या सामन्यासाठी रेफ्रींच्या निवडीवर आधीच आक्षेप घेतला होता. मैदानात कुठेही निष्पक्ष खेळ किंवा आदराची भावना दिसली नाही. आमचा स्पष्ट पेनल्टीचा दावा फेटाळण्यात आला, त्याची VAR वर तपासणीही झाली नाही. आमचा दुसरा गोल कोणत्या कारणास्तव बाद केला, हे कोणालाच समजलं नाही.”
‘…तर मी पुन्हा कधीच विश्वचषक पाहणार नाही’
सामन्यानंतर ‘beIN Sports’ला दिलेल्या मुलाखतीत हसन यांनी मुख्य रेफ्रींवर सडकून टीका केली आहे. “मी रेफ्रींना तोंडावर सांगितले की जे काही घडले ते पूर्णपणे अन्यायकारक होते. अर्जेंटिनाचा हा विजय अजिबात पात्रतेचा नाही. मी माझ्या मायदेशी परतल्यावर कधीही विश्वचषकाचे सामने पाहणार नाही, कारण या स्पर्धेत न्याय उरलेला नाही,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
फिफा कारवाई करणार?
फिफासारख्या जागतिक संस्थेवर आणि रेफ्रींवर थेट पक्षपातीपणाचे आरोप केल्यामुळे होसाम हसन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. फिफा हसन यांच्या वक्तव्याची चौकशी करत असून, त्यांच्यावर कडक शिस्तभंगविषयकची कारवाई किंवा बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
