मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष विजय पाटील यांनी शुक्रवारी कार्यकारी परिषदेची तातडीची सभा शुक्रवारी बोलावली आहे. कार्यकारी परिषदेच्या आठ सदस्यांनी ‘एमसीए’चे अध्यक्ष पाटील यांना ई-मेल पाठवून आठ मागण्यांसाठी तातडीची सभा बोलावण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना गुरुवारी पाटील यांनी शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’च्या शरद पवार अकादमी येथे सभा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘एमसीए’च्या कार्यपद्धतीबाबत नाराज असलेले कोषाध्यक्ष जगदीश आचरेकर, माजी सचिव उन्मेश खानविलकर, अजिंक्य नाईक, नदीम मेमन, किरण पोवार, अभय हडप, कौशिक गोडबोले आणि गौरव पय्याडे यांनी बुधवारी पाटील यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर या सदस्यांची गुरुवारी पाटील यांच्याशी अनौपचारिक बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.

‘एमसीए’ १९ वर्षांखालील संघाचे शिबीर जागतिक दर्जाच्या पवार क्रिकेट अकादमीत घेण्याऐवजी सफाळा येथे घेण्याच्या प्रस्तावावर सदस्यांचा आक्षेप आहे. याशिवाय कंत्राटासाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार निविदा मागवाव्यात, यावर कोषाध्यक्षांचे नियंत्रण असावे, ही मागणी सभेच्या विषयपत्रिकेवर असणार आहे.