न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालांची मालिका कायम राहिली असून महिला एकेरीतील गतविजेत्या कोको गॉफचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. अमेरिकेच्याच एमा नवारोकडून तिला पराभव पत्करावा लागला.

१३व्या मानांकित नवारोने गॉफला ६-३, ४-६, ६-३ असे पराभूत केले. या लढतीत नवारोला गॉफच्या चुकांचाही फायदा झाला. गॉफने सर्व्हिसमध्ये १९ ‘डबल फॉल्ट’ करताना नवारोला गुण बहाल केले.

दुसऱ्या मानांकित सबालेन्काने उपांत्यपूर्व फेरी गाठताना ३३व्या मानांकित एलिस मेर्टन्सचा ६-२, ६-४ असा पराभव केला.

हेही वाचा >>>Suhas Yathiraj : सुहासला सुवर्णपदकाची हुलकावणी! अंतिम सामन्यात रौप्यपदाकावर मानावे लागले समाधान

पुरुष एकेरीत अमेरिकेचा फ्रान्सिस टियाफो आणि जर्मनीचा अॅलेक्झांडर झ्वेरेव यांनी आगेकूच केली. २०व्या मानांकित टियाफोने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पॉपिरिनवर ६-४, ७-६ (७-३), २-६, ६-३ अशी मात केली. चौथ्या मानांकित झ्वेरेवने ब्रँडन नाकाशिमाला ३-६, ६-१, ६-२, ६-२ असे नमवले.

बोपण्णाएब्डेन पराभूत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांचे अमेरिकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. दुसऱ्या मानांकित बोपण्णा-एब्डेन जोडीला अर्जेंटिनाच्या १६व्या मानांकित मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टिनी जोडीने १-६, ५-७ असा पराभवाचा धक्का दिला.