Ben Stokes Retirement : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. शेवटच्या सामन्यात मैदानात उतरताना स्टोक्स भावूक झाला होता. त्यापूर्वी स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या मनातील ‘सर्वकालीन महान खेळाडू’चे नाव उघड केले. हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणी नसून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे.

आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानावर उतरताना बेन स्टोक्स भावूक झाला होता. त्याला खेळाडू आणि प्रेक्षकांनी विशेष सन्मान दिला. उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे मैदानावर स्वागत केले. बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक कमेंट केली होती. “बेन स्टोक्स हा सर्वोत्तम प्रतिस्पर्धी खेळाडूंपैकी एक आहे,” असे कोहली म्हणला होता. त्यानंतर बेन स्टोक्सनेही विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

स्टोक्सने ‘स्काय स्पोर्ट्स’ला सांगितले की, ”विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मला त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध खेळायला खूप आवडते. मी नेहमीच त्याची उर्जा आणि खेळाप्रतीच्या बांधिलकीची प्रशंसा केली आहे. मला खात्री आहे की, आम्ही मैदानावर एकमेकांविरुद्ध आणखी क्रिकेट खेळू. विराटचे विचार ऐकून फार आनंद झाला”.

हेही वाचा – Video : स्वत:ला फिट ठेवण्यासाठी विराटचा अनोखा फंडा; नेमकं काय करतो तुम्हीही बघा

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या वाईट फॉर्मशी झगडताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका सुरू केली आहे. अशा परिस्थितीमध्ये बेन स्टोक्सने त्याला ‘सर्वकालीन महान खेळाडू’ म्हटले आहे.