Marizanne Kapp Emotional Moment: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सुरू आहे. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पराभूत करून अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं होतं. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय खास आहे. कारण दोन्ही संघांनी आजवर एकदाही वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावलेली नाही. दरम्यान सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीतावेळी दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मॅरिझान कॅपला अश्रू अनावर झाले.

दक्षिण आफ्रिका महिला संघासाठी हा अतिशय खास क्षण आहे. कारण या संघाने आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत पहिल्यांदाच प्रवेश मिळवला आहे. या संघाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. इंग्लंडकडून पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केलं. या संघाने साखळी फेरीत भारतीय संघावर देखील विजय मिळवला. शेवटी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करून पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला.

राष्ट्रगीतावेळी मॅरिझान कॅपला अश्रू अनावर

मॅरिझान कॅप ही दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहोचवण्यात तिचं देखील मोलाचं योगदान राहिलं आहे. दरम्यान पहिल्यांदाच आयसीसीचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर राष्ट्रगीतावेळी तिच्या डोळ्यात पाणी दिसून आलं. हा केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आफ्रिका संघासाठी भावूक करणारा क्षण आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ : शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर

दक्षिण आफ्रिका संघ : लॉरा वॉल्वार्ड्ट (कर्णधार), तॅझमिन ब्रिट्स, ॲनीके बॉश, सुने लूस, मॅरिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), ॲनिएरी डर्कसन, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, आयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा