England Beat India by 125 Runs in 3rd T20I: इंग्लंडने भारताचा तिसऱ्या टी-२० सामन्यात लाजिरवाणा पराभव केला. भारताला या सामन्यात तब्बल १२५ धावांनी टी-२० इतिहासातील आपला सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. टी-२० चा वर्ल्ड चॅम्पियन असलेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात १०० धावाही करू शकला नाही. टीम इंडियाची संपूर्ण फलंदाजी फळी या सामन्यात अपयशी ठरली. ५ षटकांत भारताने ५ मोठ्या विकेट्स गमावल्या होत्या. मोठे फटके खेळत भारताच्या फलंदाजांनी इंग्लंडला सामना सहज जिंकू दिला. तर जोफ्रा आर्चर, जोश टंगची गोलंदाजी निर्णायक ठरली.
इंग्लंडने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी निराशा केली. अभिषेक शर्मा व वैभव सूर्यवंशी १० आणि १३ धावा करत माघारी परतले. यानंतरच्या इशान किशनने संघाचा डाव सावरला. पण सलग दोन चेंडूत इशान व श्रेयस दोघेही बाद झाले. ५ षटकांत भारताने ५ विकेट्स गमावल्या. संघाची धावसंख्या पाचव्या षटकात ५२ धावांत ५ अशी होती. त्यानंतर १२व्या षटकात संघ ७६ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ३ विकेट्स घेतल्या. तर जोश टंगने ४ विकेट्स घेत भारताचं कंबरडं मोडलं. तर विल जॅक्सने १ व आदिल रशीने २ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २०१ धावांचा डोंगर उभारला होता. फिल सॉल्ट, जोस बटलर व सॅम करन यांनी यामध्ये मोठी योगदान दिलं. तर प्रत्युत्तरात भारताचा संघ ११.४ षटकांत ७६ धावांत ऑलआऊट झाला. भारताचा एकही खेळाडू १५ धावांचा पल्लादेखील गाठू शकला नाही आणि संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यासह भारताने पहिल्यांदाच सलग पाच टी-२० सामने गमावले आहेत.
श्रेयस अय्यरने तिसऱ्या सामन्याची नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. अर्शदीप सिंगने मेडन षटकासह संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर जोस बटलरने संघाचा डाव सावरला. प्रिन्स यादवने जोस बटलर क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. बटलर ३६ धावा करत बाद झाला आणि त्यानंतर हॅरी ब्रुक १६ धावा करत गेला. इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. पण फिल सॉल्ट एक टोक सांभाळून धावांचा पाऊस पाडत होता. तर सॅम करनने त्याला चांगली साथ दिली. सॉल्ट व सॅमने अखेरच्या षटकांमध्ये ४७ धावांची भागीदारी रचली.
फिल सॉल्ट ४४ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावा करत बाद झाला. तर सॅम करनने २४ चेंडूत ४१ धावा केल्या. तर विल जॅक्सने दोन षटकार मारत १४ धावा केल्या आणि संघाला २०१ धावांपर्यंत नेलं. भारताकडून हर्षित राणा, प्रिन्स यादव २-२ विकेट्स घेतल्या.
