IND vs ENG 2nd ODI Highlights: इंग्लंड संघाने जो रूटच्या ९९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताचा दुसऱ्या वनडे सामन्यात ४ विकेट्स पराभव केला. जो रूटचं शतक हुकलं असलं तरी इंग्लंडने विजय मिळवत १-१ अशी या मालिकेत बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात या मालिकेचा निकाल लागणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा हा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल.

इंग्लंडने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ चांगल्या सुरूवातीनंतर कोसळला आणि २३३ धावांवर सर्वबाद झाला. तर प्रत्युत्तरात जो रूटने इंग्लंडच्या डावाची जबाबदारी घेत संघाला विजय मिळवून देत माघारी परतला.

भारताने दिलेल्या २३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने बेन डकेटला झेलबाद करत माघारी धाडलं. तर प्रसिधने चौथ्या षटकात जेकब बेथलला माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या जो रूट व हॅरी ब्रूकने ४५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पण ब्रूकदेखील गुरनूर ब्रारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर रूटने सॅम करनसह ४१ धावांची भागीदारी रचली. सॅम करनही २६ धावा करत माघारी परतला. यानंतर अक्षरने बटलरला १७ धावांवर क्लीन बोल्ड करत मोठी विकेट मिळवली. पण जो रूट मात्र मैदानावर कायम होता.

रूटने यानंतर विल जॅक्ससह ७२ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विल जॅक्स ३० धावा करत माघारी परतला. पण या जोडीने इंग्लंडचा विजय निश्चित केला होता. त्यानंतर जो रूटने चेंडूत ९ चौकारांसह संयमी आणि महत्त्वपूर्ण शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने चांगली सुरूवात केली. शुबमन गिल व रोहित शर्माने ४४ धावांची भागीदारी केली. पण रोहित शर्माची बॅट न चालल्याचा भारताला मोठा फटका बसला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. गिल ३१ धावा तर रोहित २६ धावा करत बाद झाला. तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावत भारताचा डाव सावरला. यानंतर विराट व श्रेयसने ६७ धावांची भागीदारी रचली आणि मोठ्या धावसंख्येच्या आशा निर्माण केला. पण आर्चरच्या चेंडूवर जीवदान मिळाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट बाद झाला.

विराट बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी बाजू कोसळली. वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे लागोपाठ बाद झाले. श्रेयस अय्यर एका बाजूने भारताची खिंड लढवत होता, पण समोरून अपेक्षित साथ मिळाली नाही. पण बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये १३ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह महत्त्वपूर्ण २० धावा केल्या. पण भारताचा संघ ४४ षटकांत २३३ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर व गस एटकिन्सन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर साकिब महमूदने २ व सॅम करन-विल जॅक्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.