England Qualify for Super-8: टी-२० विश्वचषकात इंग्लंडचा संघ सलग दुसऱ्यांदा अपसेटपासून वाचली आहे. इटलीविरूद्ध सामन्यात इंग्लंडने अखेरच्या षटकात विजय मिळवला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळविरुद्ध शेवटच्या चेंडूवर पराभवापासून थोडक्यात बचावलेल्या इंग्लंडने इटलीचा पराभव केला आहे. शेवटच्या षटकांमध्ये सॅम करनने पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि अखेरीस २४ धावांनी विजय नोंदवला. या विजयासह इंग्लंडने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे.

कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, इंग्लंडला अपसेटचा सामना करावा लागणार असं चित्र होतं. नेपाळपासून इंग्लंड वाचला होता पण इटली आता इंग्लंडला पराभूत करेल अशी स्थिती होती. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मोठी धावसंख्या गाठण्याची अपेक्षा होती. इटलीच्या गोलंदाजांची धुलाई करत इंग्लंडने २०० अधिक धावांचा आकडा गाठला. पण इटलीनेही चांगली फटकेबाजी केली. पण जेमी ओव्हरटनने अखेरचं षटक मेडन टाकत संघाची लाज राखली.

फिल साल्टने संघाला वेगवान सुरुवात करून दिली, त्याने येताच चौकारांची आतिषबाजी केली, परंतु जोस बटलरचा खराब फॉर्म पुन्हा दिसून आला. पण, सॉल्ट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या विकेट एकामागून एक पडू लागल्या. तेव्हा सॅम करन आणि विल जॅक्स यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी संघाला १५० धावांच्या पुढे नेलं. करन बाद झाल्यानंतरही, जॅक्सने नाबाद ५३ धावांची खेळी करत आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला, त्याने फक्त २१ चेंडूत अर्धशतक झळकावून संघाला २०२ धावांपर्यंत पोहोचवलं. इटलीकडून ग्रँट स्टीवर्ट आणि क्रिशन कलुगामेगे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

जोफ्रा आर्चरने त्यानंतर पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे इटलीला मोठे धक्के बसले. संघाने चार षटकांत तीन विकेट्स गमावल्या. पण इंग्लंडला पुन्हा एकदा नवीन संघाच्या अननुभवी फलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागेल याची कल्पनाही केली नसेल.

नेपाळच्या फलंदाजांप्रमाणेच, इटलीच्या जस्टिन मोस्का आणि बेन मॅनेंटी यांनी ९२ धावांची स्फोटक भागीदारी करून इंग्लिश गोलंदाजांची धुलाई केली. यामध्ये मॅनेंटीने इटलीसाठी फक्त २२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतकही केलं. विल जॅक्सने अखेर मॅनेंटीला बाद करून ही भागीदारी मोडली. मॅनेंटीने २५ चेंडूत ६ षटकार व ४ चौकारांसह ६० धावांची खेळी करत बाद झाला.

लगेचच मोस्कादेखील ४३ धावांवर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला. १६व्या षटकात सलग दोन विकेट्स घेणाऱ्या सॅम करनमुळे इटलीचा डाव डगमगताना दिसत होता, पण संघातील इतर फलंदाजांनी वादळी कामगिरी केली. नवीन फलंदाज ग्रँट स्टीवर्टने २३ चेंडूत ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. त्याने जोफ्रा आर्चरच्या षटकात दोन षटकार आणि त्यानंतर १८ व्या षटकात आदिल रशीदच्या षटकात तीन षटकार मारले. यामुळे इंग्लंडला विश्रांती मिळाली. शेवटच्या दोन षटकांत फक्त ३० धावांची गरज असताना, करनने पुन्हा एकदा सामना फिरवला. त्याने षटकात फक्त पाच धावा दिल्या आणि स्टीवर्टची विकेट घेतली. इटलीचा डाव शेवटच्या चेंडूवर १७८ धावांवर संपला.