भारत आणि इंग्लंड मालिकेतील पाचवी कसोटी करोनामुळे रद्द झाली. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ”खेळाडूंनी मँचेस्टर कसोटी खेळण्यास नकार दिला होता. करोनामुळे ते घाबरले होते”, असे गांगुलीने सांगितले. टीम इंडिया मालिकेत २-१ ने पुढे होती. मालिकेची अंतिम कसोटी अद्याप निश्चित झालेली नाही. पुढच्या वर्षी ती होईल अशी चर्चा आहे.

टेलीग्राफच्या बातमीनुसार, सौरव गांगुलीने सांगितले, ”खेळाडूंनी कसोटी खेळण्यास नकार दिला असला तरी त्यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. फिजिओ योगेश परमार खेळाडूंच्या जवळ होते. ते त्यांच्यासोबत सतत काम करत होते. जेव्हा खेळाडूंना कळले की ते पॉझिटिव्ह आहेत, तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. बायो बबलमध्ये जगणे सोपे नाही. आपण त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सध्याच्या मालिकेचा तो भाग असू शकत नाही. पुढच्या वर्षी ती आयोजित केले जाऊ शकते. मात्र, इंग्लिश बोर्डाचे खूप नुकसान झाले आहे.”

हेही वाचा – वर्ल्डकपपूर्वी ‘स्टार’ क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; आजच खेळणार देशासाठीचा शेवटचा सामना

रवी शास्त्री यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा करोनाचा मुख्य स्रोत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत गांगुली म्हणाला, ”कार्यक्रमासंदर्भात कोणतीही परवानगी मागण्यात आली नव्हती. शास्त्रींवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तुम्ही लोकांना किती काळ हॉटेलच्या खोल्यांमध्ये बंदिस्त ठेवू शकता? हे मानवी दृष्ट्या शक्य नाही. मीसुद्धा तिथे शूटिंगसाठी गेलो होतो. सुमारे १०० लोक होते. प्रत्येकाला लसीकरण करण्यात आले. पण काय होईल ते माहीत नाही. दोन लसीनंतरही लोकांना संसर्ग होत आहे.”

धोनीबाबत गांगुली म्हणाला…

मेंटॉर म्हणून धोनीची भारतीय संघात निवड झाल्याबाबत गांगुली म्हणाला, ”तो फक्त टी-२० वर्ल्ड कपसाठी आहे. त्याने आम्हाला हे स्पष्टपणे सांगितले आहे. रवी शास्त्री कदाचित पूर्णवेळ कोचिंग करण्यास तयार नाहीत, आजपर्यंत आम्ही त्यांना याबद्दल स्पष्टपणे काहीही विचारले नाही. जेव्हा ते येतील, तेव्हा आम्ही बोलू.”