Joe Root Record In England vs Pakistan 1st Test: पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले येथे सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या १७१ धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी इंग्लंडने दमदार सुरुवात केली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट पहिल्या दिवशी नाबाद परतला. दरम्यान हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच जो रूटच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

जो रूटच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेला पहिला कसोटी सामना हा जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील १६७ वा कसोटी सामना आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच रूटने मोठ्या रेकॉर्डमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला मागे टाकलं आहे. कॅलिसला दक्षिण आफ्रिकेकडून १६६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. कॅलिसला मागे टाकून आता रूटने इंग्लंडचा माजी खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ब्रॉडच्या नावे देखील कसोटी क्रिकेटमध्ये १६७ सामने खेळण्याची नोंद आहे. या यादीत तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी फ्लॉप सुरुवात केली. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या १७१ धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिकने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर इमाम उल हकने ४२ धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून गोलंदाजी करताना ऑली रॉबिन्सनने आणि जोश टंगने प्रत्येकी ५-५ गडी बाद केले.

इंग्लंडची दमदार सुरुवात

पाकिस्तानचा डाव स्वस्तात आटोपल्यानंतर इंग्लंडकडे पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. इंग्लंडकडून सलामीला आलेल्या बेन डकेट आणि एमिलियो गे ने पहिल्या विकेटसाठी ३६ धावा धावा जोडल्या. त्यानंतर ४८ धावांवर इंग्लंडला दुसरा मोठा धक्का बसला. डकेट १५ तर गे ३३ धावा करुन माघारी परतला. मुख्य म्हणजे, जो रूट आणि जॉर्डन कॉक्सची जोडी अजूनही मैदानावर आहे. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली आहे. रूट ३७ तर कॉक्स २३ धावांवर नाबाद आहे. आता दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.