Babar Azam Named Unwanted Record: इंग्लंडमध्येही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. पहिल्या सामन्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केलं. पण पुनरागमनात तो हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. पहिल्या डावात फलंदाजी करताना तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला. यासह त्याच्या नावे लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २९० धावांवर आटोपला होता. त्यामुळे पाकिस्तानकडे इंग्लंडवर आघाडी घेण्याची संधी होती. पण, पाकिस्तानचा डाव अवघ्या ११० धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत इंग्लंडने पाकिस्तानवर २६१ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यात बाबर आझमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो नेहमीप्रमाणे स्वस्तात माघारी परतला. २०२२ पासून तो कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकलेला नाही. त्याने शेवटचं कसोटी शतक डिसेंबर २०२२ मध्ये झळकावलं होतं. म्हणजेच त्याला शेवटचं शतक झळकावून जवळपास १००० दिवस उलटले आहेत.यासह त्याच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

बाबर आझमने २०२३ पासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक न झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत तो टॉप- ५ खेळाडूंच्या यादीत पोहोचला आहे. मुख्य बाब म्हणजे, या यादीत बहुतांश गोलंदाज आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क अव्वल स्थानी आहे. स्टार्कने २०२३ पासून ५० डाव खेळून एकही शतक झळकावलेलं नाही. या यादीत ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन , पॅट कमिन्स आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा देखील समावेश आहे. या यादीत आता बाबर आझमने टॉप ५ मध्ये प्रवेश केला आहे.

२०२३ पासून शतक न झळकावता आलेले फलंदाज (सर्वाधिक डावात)

मिचेल स्टार्क- ५० डावात
पॅट कमिन्स- ४७ डावात
मोहम्मद सिराज- ४४ डावात
नॅथन लायन- ४१ डावात
बाबर आझम – ३७ डावात

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २९० धावांवर आटोपला. या डावात फलंदाजी करताना जेमी स्थिमने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर जॉर्डन कॉक्सने ५५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या ११० धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने २६१ धावांची आघाडी घेतली आहे.