Ollie Robinson Breaks Jasprit Bumrah Record: पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील तिसरा सामना बर्मिंघममध्ये सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान पाकिस्तानला पहिला धक्का देताच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने जसप्रीत बुमराहचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
ऑली रॉबिन्सनच्या १०० विकेट्स पूर्ण
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. पाकिस्तानकडून सईम अयुब आणि अजान अवैसची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानावर आली. डावातील तिसऱ्याच षटकात ऑली रॉबिन्सनने सईम अयुबला शून्यावर पायचीत करून माघारी धाडलं. राऊंड द विकेटचा मारा करताना ऑली रॉबिन्सनचा चेंडू वेगाने आत आला आणि सईम अयुबच्या पॅडला जाऊन लागला. खेळाडूंनी जोरदार अपील केलं आणि अंपायरने त्याला बाद घोषित केलं. हा ऑली रॉबिन्सनच्या कसोटी कारकिर्दीत १०० वा विकेट ठरला.
ऑली रॉबिन्सनने मोडला जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड
ऑली रॉबिन्सनने सईम अयुबला बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. ऑली रॉबिन्सन हा गेल्या १०० वर्षांत २० पेक्षाही कमीच्या सरासरीने १०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. रॉबिन्सनने या १०० विकेट्स १९.३४ च्या सरासरीने घेतल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावे होता. बुमराहने १९.७९ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत इंग्लंडचा गोलंदाज जॉनी वॉर्डले तिसऱ्या स्थानी आहे. त्याने २०.३९ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅलन डेव्हिडसनने २०.५३ च्या सरासरीने १०० विकेट्सचा पल्ला गाठला होता. तसेच वेस्ट इंडिजच्या मॅलकम मार्शल यांनी २०.९४ च्या सरासरीने १०० विकेटस् घेतल्या होत्या.
गेल्या १०० वर्षांत कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी सरासरी (१००+ बळी)
१९.३४ – ऑली रॉबिन्सन (इंग्लंड)*
१९.७९ – जसप्रीत बुमराह (भारत)
२०.३९ – जॉनी वॉर्डल (इंग्लंड)
२०.५३ – अॅलन डेव्हिडसन (ऑस्ट्रेलिया)
२०.९४ – माल्कम मार्शल (वेस्ट इंडिज)
