Michael Vaughan On Pakistan Cricket Team: पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने २९० धावा केल्यानंतर, पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या ११० धावांवर आटोपला. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीक्रमाची तुलना थेट काऊंटी क्रिकेटमधील दुसऱ्या डिव्हिजनच्या संघासोबत केली आहे.

लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानच्या फलंदाजांचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला. पाकिस्तानवर टीका करताना मायकेल वॉन म्हणाले की, “इंग्लंडचे गोलंदाज तर दमदार गोलंदाजी करत आहे. पण पाकिस्तानचा फलंदाजीक्रम सेंकड डिव्हिजन काऊंटी क्रिकेटसारखा का आहे? कोणत्याही पातळीवर हा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील फलंदाजीक्रम वाटत नाही.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “खरं सांगू तर इंग्लंडच्या गोलंदाजांना कुठलंही आव्हान मिळत नाहीये. बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानचा हा सर्वात सोपा फलंदाजीक्रम आहे. या फलंदाजीक्रमाविरुद्ध गोलंदाजी करणं अगदीच सोपं आहे. सर्व गोलंदाजांना गोलंदाजी करावसं वाटत असेल. कारण त्यांना माहीत आहे की, गोलंदाजी करायला आलो की विकेट्स घेण्याची सोपी संधी आहे. हे फलंदाज त्यांचा रेकॉर्ड खराब करू शकणार नाहीत. हे तर असं आहे की सर्व गोलंदाज पुढे येऊन हेच विचारताय की, कोणाला विकेट हवी आहे.?”

लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने ६६.४ षटकं फलंदाजी करुन २९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ३७ षटकांत अवघ्या ११० धावांवर गारद झाला. एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. कर्णधार बाबर आझम तर अवघ्या ८ धावा करुन माघारी परतला. यादरम्यान केवळ २ असे फलंदाज होते जे दुहेरी आकडा गाठू शकले. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात १८० धावांची भक्कम आघाडी घेतली. इंग्लंडकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर जॉर्डन कॉक्सने ५५ आणि गस एटकिंसनने ४५ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २९० धावांवर पोहोचवली.