पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटीत जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने ३ गडी राखून मात केली. दुसऱ्या डावात विजयासाठी २७७ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडने ११७ धावांत ५ बळी गमावले होते. पण मधल्या फळीतील बटलर-वोक्स जोडीने दमदार भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंडचा प्रतिभावान फलंदाज ओली पोप याचा बळी चर्चेचा विषय ठरला. अतिशय अनपेक्षित अशा प्रकारच्या चेंडूवर तो बाद झाला. ‘गुड लेन्थ’च्या आसपास पडलेला चेंडू अपेक्षेपेक्षा काहीसा जास्त उसळला आणि थेट पोपच्या ग्लोव्ह्जवर आदळला. सुरूवातीला पोपला चेंडू कसा उडला अन कुठे गेला काहीच कळलं नाही. चेंडू कुठे जातोय हे समजतेपर्यंत शादाब खान स्लिपमधून पुढे धावत येत झेल टिपला. त्यामुळे ओली पोपला ७ धावांवर माघारी परतावे लागले.

पोप बाद झाल्याने इंग्लंडची दुसऱ्या डावात ११७ धावांत ५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर बटलर-वोक्सने सामना जिंकवून देणारी भागीदारी केली. ती जोडी पाकिस्तानी फिरकीपटू यासिर शहाने खूप वेळाने फोडली. पण ख्रिस वोक्सने इंग्लंडचा विजय साकारला. २७७ धावांचे आव्हान इंग्लंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.