ENG vs SL 3rd Test Highlights Sri Lanka beat England Pathum Nissanka century : श्रीलंकेच्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेने ८ विकेट्सनी विजय मिळवत इंग्लंडमधील १० वर्षापासूनचा कसोटी विजयाचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर हा श्रीलंकेचा इंग्लंडमधील चौथा कसोटी विजय आहे. या विजयात सलामीवीर पाथुम निसांकाची सर्वात मोठी भूमिका होती. त्याने शानदार फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. निसांकाने या शतकासह इतिहास घडवला आहे. इंग्लंडमध्ये कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा निसांका पहिला श्रीलंकन खेळाडू ठरला आहे.

पाथुम निसांका हा पहिला श्रीलंकेचा खेळाडू ठरला –

इंग्लंडमध्ये कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा पाथुम निसांका हा पहिला श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे. आपल्या शानदार खेळीत निसांकाने १२४ चेंडूत १०२.४२ च्या स्ट्राईक रेटने १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १२७ धावा केल्या. निसांकाने याआधी पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याने ९ चौकार मारत ५१ चेंडूत एकूण ६४ धावा केल्या होत्या. हे त्याचे कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक आहे.

या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ऑली पोपच्या १५४ धावांच्या जोरावर सर्वबाद ३२५ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने पहिल्या डावात सर्वबाद २६३ धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात इंग्लंड संघाची फलंदाजी ढेपाळली आणि संपूर्ण संघ १५६ धावांवर गारद झाला. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला २१९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे ४१व्या षटकात पाथुम निसांकाचे शतक आणि अँजेलो मॅथ्यूजच्या नाबाद ३२ धावांच्या जोरावर गाठले. कुसल मेंडिसने ३७ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा केल्या, तर दिमुथ करुणारत्नेने २१ चेंडूत एक चौकार मारून ८ धावा केल्या.

श्रीलंकेने इंग्लंडमध्ये १० वर्षानंतर कसोटी जिंकली –

श्रीलंकेने ३३७० दिवसांनी इंग्लंडला त्यांच्या भूमीवर कसोटी सामन्यात पराभूत केले. श्रीलंकेने २४ जून २०१४ रोजी इंग्लंडला त्यांच्या भूमीवर अखेरचा पराभव केला आणि त्यानंतर आता या संघाला इंग्लंडमध्ये विजय मिळाला. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक आणि नंतर दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावणाऱ्या पाथुम निसांकाची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या कसोटी मालिकेसाठी कमिंदू मेंडिस आणि जो रूट यांना प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. या शानदार विजयासह श्रीलंकेने एक मोठा विक्रम केला. इंग्लंडमध्ये चौथ्या डावातील लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा तो पहिला उपखंडीय संघ ठरला आहे.