England vs Sri Lanka 3rd Test ICC WTC PointsTable: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेली तीन कसोटी सामन्यांची मालिका संपली आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली, पण अखेरचा कसोटी सामना जिंकत श्रीलंकेने सर्वांची मन जिंकली आहेत. श्रीलंकेच्या संघाने तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत कमालीचा बदल घडवून आणला आहे.

१० वर्षांनी इंग्लंडचा घरच्या मैदानावर श्रीलंकेने केला पराभव

तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटीत श्रीलंकेने इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयानंतरही श्रीलंकेच्या संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका १-२ ने गमावली. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडने अनुक्रमे ५ विकेट्स आणि १९० धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने यापूर्वी २० जून २०१४ रोजी घरच्या मैदानावर इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला होता. तो कसोटी सामना लीड्समध्ये खेळला गेला होता. विशेष बाब म्हणजे श्रीलंकेने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर दोन कसोटी सामने खेळले असून दोन्ही कसोटी सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – ENG vs SL 3rd Test : पाथुम निसांकांच्या खणखणीत शतकासह श्रीलंकेने संपवला इंग्लंडमधला विजयाचा दुष्काळ

श्रीलंकेने यापूर्वी २७ ऑगस्ट १९९८ रोजी लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे कसोटी सामना खेळला होता आणि त्यात १० गडी राखून विजय मिळवला होता. या विजयासह श्रीलंकेचा संघ २०२३-२०२५ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा संघ टॉप-५ मधूनही बाहेर गेला आहे.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा

WTC Points Table 2023-25: गुणतालिकेत श्रीलंकेची झेप

इंग्लंड संघ आता डब्ल्यूटीसी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला आहे, तर दक्षिण आफ्रिका सातव्या स्थानावर घसरला आहे. या कसोटी सामन्याचा निकाल येण्यापूर्वी WTC पॉइंट्स टेबलमध्ये श्रीलंका संघ सातव्या स्थानावर होता. इंग्लंड संघ पहिल्या दोन कसोटीत श्रीलंकेला पराभूत करत ४५ टक्के गुणांसह ५व्या क्रमांकावर पोहोचला, परंतु आता संघ पुन्हा खाली घसरला आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचे ४५ टक्के गुण होते, ते आता ४२.१८ वर आले आहे. एक सामना गमावल्याने संघाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु निश्चितपणे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे गुण टेबल खूपच मनोरंजक बनले आहे.

हेही वाचा – Ganesh Chaturthi: बांगलादेशच्या खेळाडूने गणेश चतुर्थीनिमित्त केली बाप्पाची प्रतिष्ठापना, फोटो केले शेअर

WTC Points Table: श्रीलंकेच्या इंग्लंडवरील विजयानंतर गुणतालिका

इंग्लंड वि. श्रीलंका तिसरा कसोटी सामना

लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात ६९.१ षटकांत ३२५ धावा केल्या. श्रीलंकेचा पहिला डाव ६१.२ षटकांत २६३ धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडला ६२ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ३४ षटकांत अवघ्या १५६ धावांत आटोपला. अशाप्रकारे श्रीलंकेला विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी २ गडी गमावून पूर्ण केले.

दुसऱ्या डावात श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकाने १२४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १२७ धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूज ६१ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिला. श्रीलंकेला १० वर्षांनंतर इंग्लंड संघाविरूद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर विजय मिळाला आहे.