England-W vs South Africa -W Highlights: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा थरार इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. पण शेवटी इंग्लंडने ४० धावांनी सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

या सामन्यात इंग्लंडचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडला हवी तशी सुरुवात करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर अवघ्या ३५ धावांवर इंग्लंडचे ३ प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. डॅनी वॅट हॉज, एलिस कॅप्सी आणि एमी जोन्स हे तिन्ही फलंदाज हवी तशी सुरुवात करून देऊ शकले नाहीत. पण त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. कर्णधार नेट सिव्हर ब्रंट आणि हिदर नाईट या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला . दोघांनी मिळून १३३ धावांची विक्रमी भागीदारी केली. सिव्हर ब्रंटने ३५ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह हिदर नाईटनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि इंग्लंडची धावसंख्या १६९ धावांवर पोहोचवली.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७० धावांचा डोंगर सर करायचा होता. दक्षिण आफ्रिकेलाही अपेक्षित सुरुवात करता आली नाही. कर्णधार लॉरा वॉल्वार्ड्टकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण ती स्वस्तात माघारी परतली. दक्षिण आफ्रिकेकडून ताजमिन ब्रिट्सने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पण तिला इतर कुठल्याही फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेला २० षटकांअखेर ८ गडी बाद १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ४० धावांनी गमावला.

पहिल्या डावात फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. तर धावांचा बचाव करताना गोलंदाजांनीही आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. लॉरेन बेल आणि चार्ली डीनने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर लिन्सी स्मिथ, सोफी एकलेस्टन आणि फ्रेया केम्पने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.