इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका म्हटलं की, मैदानात युद्धासारखं वातावरण असतं. अ‍ॅशेस मालिका या वर्षाअखेरिस होणार आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडनं १७ खेळाडूंची घोषणा केली होती. या संघात प्रमुख खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. तर संघाचं नेतृत्व जो रूटच्या हाती असणार आहे. मात्र या संघात दुखापतीमुळे बेन स्टोक्सची निवड झाली नव्हती. मात्र आता बेन स्टोक्स खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंक क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती देत बेन स्टोक्स अ‍ॅशेस मालिकेत खेळणार असल्याचं सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान अ‍ॅशेस मालिका ८ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तसेच शेवटचा सामना १४ ते १८ जानेवारीला खेळला जाणार आहे.

बेन स्टोक्स बोटाची दुखापत आणि मानसिक आरोग्याच्या कारणामुळे क्रिकेट मैदानापासून दूर होता. मात्र आता डॉक्टर्स आणि इंग्लंडच्या मेडिकल टीमने त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. बेन स्टोक्स आता इतर खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. “मी मानसिक आरोग्यामुळे क्रिकेट मैदानापासून दुरावलो होतो. आता माझ्या बोटाची जखम बरी होत आली आहे. आता मी इतर खेळाडूंना पाहण्यासाठी आतूर आहे.मैदानात त्यांच्यासोबत खेळण्यासाठी तयार आहे. मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज आहे.”, असं बेन स्टोक्सने सांगितलं आहे. इंग्लंड क्रिकेटनेही याबाबतचं ट्वीट केलं आहे.

“माझी बेन स्टोक्स आणि डॉक्टर्ससोबत संवाद होत होता. त्याच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याने मला सांगितलं की, क्रिकेट मैदानात परतण्यास आतूर आहे. अॅशेस मालिकेत भूमिका बजावण्यास सज्ज आहे.”, असं इंग्लंड क्रिकेट मॅनेजिंग डायरेक्टर एश्ले जाइल्स यांनी सांगितलं.

अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ
जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पॉप, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड