लंडन : न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमची गुरुवारी इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली.

इंग्लंडच्या संघाला गेल्या १७ पैकी केवळ एक कसोटी सामना जिंकता आला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जो रूटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी अष्टपैलू बेन स्टोक्सकडे या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. आता ४० वर्षीय मॅक्युलमची प्रशिक्षकपदी निवड करत इंग्लंडने आणखी एक आक्रमक पाऊल उचलले आहे. माजी यष्टीरक्षक-फलंदाज मॅक्युलमची न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू आणि कर्णधारांमध्ये गणना होते. सध्या तो ‘आयपीएल’ संघ कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षकपद भूषवत आहे. ‘आयपीएल’ संपल्यावर तो इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळेल. जूनमध्ये न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.